नगर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचे कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर रिक्षा मोर्चा काढण्यात आला. शासनाने याबाबत तातडीने दखल न घेतल्यास राज्यभर मोर्चा-आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.
विविध मागण्यांसाठी रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेने वेळोवेळी आंदोलने केली. परंतु प्रत्येक वेळी सरकारी स्तरावर आश्वासनेच दिली जातात. कार्यवाही संथ गतीने सुरू आहे. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी रिक्षा मोर्चा काढण्यात आल्याचे पुणे रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी सांगितले.
आमदार संग्राम जगताप यांनी या मोर्चात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. रिक्षा चालक-मालक संघटनेच्या मागण्यांसाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. तसेच कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करू, अशी ग्वाही आमदार संग्राम जगताप यांनी दिली शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसी लागू कराव्यात, ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी, अवैध प्रवासी वाहतूक रोखावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
या वेळी अविनाश घुले, बाबा अरगडे यांची भाषणे झाली. संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशिकर, कार्याध्यक्ष विलास कराळे, आयटकचे अभय टाकसाळ, लतिफ शेख, गणेश आटोळे, नारिस खान, सुधाकर साळवे आदीसह रिक्षाचालक सहभागी झाले होते.
हेही वाचा :