नगर; पुढारी वृत्तसेवा : महसूल विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राज्यात शनिवार, रविवार उपनिबंधक कार्यालय सुरू राहणार आहे. त्यामुळे आता शनिवारी, रविवारी खरेदी विक्रीचे व्यवहार होणार आहे. राज्यात काही ठिकाणी हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाजूला नवीन महसूल भवन या इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर पालकमंत्री विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
समन्यायी पाणी वाटपबाबत पत्रकारांशी विचारले असता ते म्हणाले, समन्यायी पाणी वाटपाचा निर्णय समन्वयाने घेतला पाहिजे. वरच्या भागातील धरणातील पाणी आणि जायकवाडीतील पाणी साठ्याचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. श्रेयवादाने प्रश्न सुटणार नसून समन्वयाने प्रश्न सुटतील. मेंढीगिरी समितीचे पूर्नावलोकन होणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटपात जिल्ह्यावर कोणत्या प्रकारे अन्याय होऊ दिला जाणार नाही. पाणी प्रश्नाचे कोणीही राजकारण करू नये, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर विखे पाटील म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा भावनेचा आहे. आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे याचा विचार होणे आवश्यक आहे. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची 51 टक्क्याची मर्यादा आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे.
महसूलच्या अधिकार्यांनी तेलंगणा, हैद्राबाद येथे जाऊन कुणबीच्या नोंदी शोधल्या आहेत. अन्य समाजाचे आरक्षण मागितल्यास संघर्ष निर्माण होईल. कायद्याच्या चौकीत बसून आरक्षण दिल्यास निश्चित यश येईल. पीकविम्यासंदर्भात ज्या भागातून तक्रारी प्राप्त झाल्या तिथे 40 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 82 कोटी रुपये देण्यात आले आहे. आपल्याकडे तशी परिस्थिती नाही. पीक पाहणी केल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असेही विखे पाटील म्हणाले.
राज्यात गुटखा बंदी असतानाही सर्रास गुटखा विक्री होत आहे. शाळा महाविद्यालच्या आवारात गुटख्या पुढ्या लटकलेल्या दिसतात हे दुदैव आहे. संबंधित विभागाने कडक कारवाई अपेक्षित आहे. यापुढे दखल घेऊन सुधारणा करण्यात येईल.
हेही वाचा