अहमदनगर

नगर : ओढ्या-नाल्यांवरील बांधकामे हटवा ; स्थायी समितीच्या आढावा बैठकीत मागणी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : सावेडी-बोल्हेगावसह मुख्य शहरामध्ये ओढ्या-नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, अनेकांनी पक्की बांधकामे केली आहेत. पावसाळा जवळ आला तरी अतिक्रमणे जशीच्या तशीच आहेत. मनपाने ओढ्या-नाल्यांवरील अतिक्रमणे तत्काळ हटवावे. अतिक्रमणधारकांना नोटिसा काढून बांधकाम आराखडेही रद्द करा, अशी मागणी सर्वच नगरसेवकांसह विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आज स्थायी समितीच्या आढावा बैठकीत केली.

मनपाची स्थायी समितीची सभा सोमवारी झाली. त्या सभेला अधिकारी हजर नसल्याने तक्रार कोणाकडे करायाची अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे सभापती गणेश कवडे बुधवारी सर्वच विभागाची आढावा बैठक ठेवली होती. त्यानुसार आज दुपारी सभापती कवडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, मुद्दसर शेख, प्रदीप परदेशी, सुनीता कोतकर, पल्लवी जाधव, राहुल कांबळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, नगरसचिव एस. बी. तडवी यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. शहरातील ओढ्या-नाल्यावर पाईप टाकून ओढे बुजविल्याचे सर्वेक्षणात सिद्ध झाले आहेत. त्यावर आयुक्तांनी ओढ्या-नाल्यांवर पाईप तत्काळ काढण्यास सांगितले होते. मात्र, अद्यापि त्यावर कोणतीच कार्यवाही का झाली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी उपस्थित केला. त्यावर नगररचनाकार राम चारठाणकर यांनी पहिल्या टप्प्यात ओढ्यावरील पाईप काढण्यात येतील असे सांगितले.

विद्युत विभाग वार्‍यावर
महापालिकेत एकाच वेळी दोन अभियंते सेवानिवृत्त झाल्याने विद्युत विभागाचा पदभार घेण्यास कुणीच तयार नाही. अनुकंपा तत्त्वावर नव्याने रूजू झालेले उपअभियंता बल्लाळ यांच्या विद्युत विभागाचा कार्यभार सोपविला आहे. अखेर सदस्यांच्या सूचनेनुसार तीन महिन्यांसाठी विद्युत विभागाचा पदभार प्रभारी शहर अभियंता मनोज पारखे यांच्याकडे सोपविण्यात आला.

अग्निशमनला कर्मचारी द्या : कवडे
अग्नीशमन विभागात तीनच चालक आहेत. या तिघांना आठवड्यातून एक सुट्टी द्यावी लागते. शहरात कुठे आगीची घटना घडली तर आगीवर नियंत्रण कसे मिळवायचे. त्यामुळे तत्काळ चालकांची व्यवस्था करा, अशी माणगी अग्निशमन विभागप्रमुख शंकर मिसाळ यांनी केली. त्यावर सभापती कवडे यांनी अस्थापना विभागप्रमुख साबळे यांना योग्य कार्यवाही करून चालक पुरविण्याची सूचना केली.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT