अहमदनगर

पाथर्डीत बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा

अमृता चौगुले

पाथर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागीय भरारी पथकाने पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी येथील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा टाकत सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईमुळे जिल्ह्यात बनावट दारू तयार होत असल्याची बाब उघड झाली आहे. सतिश नवनाथ डमाळे (वय 38़), नितीन रामनाथ डमाळे (वय 30, दोघे रा.बोंदरवाडी ता.पाथर्डी), सुखदेव ज्ञानदेव आंधळे (वय 55, रा.जिरेवाडी ता.पाथर्डी), अरुण विठ्ठल कराड (वय 32), संजय विठ्ठल कराड (वय 28, दोघे रा.येळी,ता.पाथर्डी) या पाच आरोपींना पथकाने बनावट दारू तयार करताना रंगेहाथ पकडले.

यातील सतिश डमाळे व नितीन डमाळे या दोघांना पाथर्डी न्यायालयाने 22 जूनपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जिरेवाडी येथे सुखदेव ज्ञानदेव आंधळे याच्या शेतातील राहत्या घराच्या पाठीमागे पत्रा शेडमध्ये बनावट देशी दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागीय भरारी पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत स्पिरीटने भरलेले 35 लिटरच्या दोन प्लास्टीक कॅन, 175 लिटर देशी दारुचा तयार ब्लेंन्ड, 19 बॉक्स, देशी दारुची बनावट झाकणे, लेबल, बाटल्याना सील करण्याचे मशीन, 90 मिलीच्या 29 हजार रिकाम्या बाटल्या, 180 मिलीच्या 12 हजार 500 रिकाम्या बाटल्या तसेच बनावट देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य व एक टाटा कंपनीचा टेम्पो असा एकूण पाच लाख 82 हजार 325 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT