अहमदनगर

Radhakrishna Vikhe : संगमनेरात रोजगार नाही ही शोकांतिका! राधाकृष्ण विखे

अमृता चौगुले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यामध्ये औद्योगिक वसाहतीचे एमआयडीसीत रूपांतर न झाल्यामुळे मोठ्या औद्योगिक कंपन्या येथील औद्योगिक वसाहतीमध्ये आल्या नाहीत. म्हणून या तालुक्यात तरुणांना बाहेर जावे लागते, ही या तालुक्याची शोकांतिका असल्याचे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता सोडले. शिर्डी येथे श्रीसाईबाबांच्या पावनभूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पा. यांनी मालपाणी लॉन्स येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील युवकांना जिल्ह्यातच रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने नगर, शिर्डी व सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्तार करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे असे सांगत, पुढील एक ते दीड वर्षात शिर्डी येथे विकसीत होणार्‍या औद्योगिक वसाहतीमधून किमान 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

संगमनेर तालुक्यातून बहुसंख्येने नागरीकांनी या सभेत सहभागी होण्यासाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन करुन, पंतप्रधान मोदी यांचा दौरा जिल्ह्याच्या विकासासह व युवकांच्या भविष्यासाठी मोठी संधी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सभेच्या प्रचारार्थ रथाचा शुभारंभ मंत्री विखे पा. यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बापुसाहेब गुळवे, वसंतराव देशमुख, वसंतराव गुंजाळ, तालुकाध्यक्ष सतिष कानवडे, शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेना शहराध्यक्ष सोमनाथ कानकाटे, ज्ञानेश्वर कर्पे, जावेद जहागिरदार, अमोल खताळ, राम जाजू, किशोर नावंदर, राजेंद्र सांगळे, सदाशिव थोरात, राजेंद्र सांगळे, रविंद्र थोरात, अशोक कानवडे, शरद गोर्डे, बुवाजी खेमनर, शौकत जहागिरदार, रऊफ शेख, प्रशांत वामन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री विखे पा. म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. या निर्णयांचा प्रत्येक लाभ गावपातळीपर्यंत मिळाला. कोविड संकटापासूनची सर्व परिस्थिती आपण अनुभवली. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व खंबिरपणे उभे राहिल्यानेच देश या संकटातून बाहेर पडला. आज जगामध्ये देशाची प्रतिमा एक विकसनशिल भारत म्हणून निर्माण झाली. 'जी 20' परिषदेचे अध्यक्षपद हा संपूर्ण भारताचा गौरव असल्याचे मंत्री विखे पा. म्हणाले.

राज्यात महायुती सरकार निर्णय घेत आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेसह आता पशुधनास पीक विमा योजना सुरु करण्याचा शासन विचार करीत आहे. खरेतर दूध संघांनी अशी योजना सुरु करायला हवी होती, पण ते त्यांच्याकडून न झाल्याने शासन या योजनेची अंमलबजावणी करेल, असे आश्वासन देत, मंत्री विखे पा. म्हणाले, केंद्र व राज्याच्या माध्यमातून जिल्हा विकासाचे काम सुरु आहे. वंदे भारत एक्सप्रेस, समृध्दी महामार्ग ही मोठी उपलब्धी विकासाच्यादृष्टीने झाली. या पायाभूत सुविधांचा उपयोग करुन, जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवरचं रोजगार निर्माण करणाचा प्रयत्न असल्याचे मंत्री विखे यांनी ठामपणे सांगितले.

शिर्डी येथे होवू घातलेली औद्योगिक वसाहत या भागात तरुणांना मोठी संधी ठरणार आहे. तब्बल 500 एकर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आय. टी. पार्क, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा कंपनीसारखे मोठे प्रकल्प येथे यावे, यासाठी बोलणे झाले. त्यादृष्टीने आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. येत्या एक ते दीड वर्षात किमान 10 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरुन काम सुरु झाल्याचे मंत्री विखे पा. यांनी ठणकावून सांगितले. यावेळी माजी आ. वैभव पिचड, शिवाजी धुमाळे, जलसंपदा, महसूल, व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी करणार धरणाचे लोकार्पण..!

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी निळवंडे येथे धरणस्थळी भेट देवून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी धरणस्थळी धरणाचे लोकार्पण करणार आहेत. जल पुजन करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याने प्रशासनाने धरण स्थळी केलेल्या तयारीची पाहणी मसहूल मंत्री विखे पा. यांनी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT