अहमदनगर

रब्बीचे क्षेत्र 25 हजार हेक्टरने घटणार!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने खरिपापाठोपाठ आता रब्बीवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. या वर्षी रब्बीचे तब्बल 25 हजार हेक्टर क्षेत्र घटणार आहे. यात शाश्वत पाण्याच्या समस्येमुळे गहू आणि कांद्याचे क्षेत्र कमी दिसेल. तर उपलब्ध पाण्यातून ज्वारीसह हरभर्‍याचे क्षेत्र मात्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे. जिल्ह्यात पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे छोटे-मोठे तलाव, ओढे नाले वाहू शकले नाहीत. परिणामी पाण्याची पातळी अपेक्षित वाढलेली नाही. त्यामुळे रब्बीत पाण्याची समस्या जाणवणार आहे.

आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा अंदाज बांधूनच शेतकरी आता रब्बीचे नियोजन करत आहेत. यात गव्हाला चार ते पाच पाणी लागतात. मात्र पुरेसे पाणी नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी एक-दोन पाण्यावर येणार्‍या ज्वारी व हरभरा पिकांना प्राधान्य दिले आहे. तसेच पाण्याच्याच संभाव्य समस्येमुळे कांदा लागवडीसाठीही शेतकरी धजावताना दिसत नाही. उलट ज्या शेतकर्‍यांकडे मुबलक पाणी आहे, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणविणार नाही, असेच शेतकरी कांद्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. काही शेतकर्‍यांनी कांदा रोपे टाकली मात्र आता पाणी नसल्याने ही रोपे विकण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात 4,25,650 हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला होता. या वर्षी कृषी विभागाच्या प्रस्तावित अंदाजानुसार हे क्षेत्र 3,94,170 हेक्टर इतके खाली येऊ शकते. याचा तुलनात्मक आढावा घेतल्यास गतवर्षी 1 लाख 49 हजार 191 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली होती. या वर्षी ज्वारीच्या क्षेत्रात सुमारे 50 हजार हेक्टरची वाढ गृहीत धरून 2 लाख 15 हजार हेक्टर ज्वारी पेरणीचा अंदाज कृषी विभागाने कळविला आहे. त्यानुसार 100 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तसेच गतवर्षी हरभरा 1 लाख 9 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर घेतला होता. या वर्षी या क्षेत्रातही काहीशी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र, उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता गहू आणि कांद्याचे क्षेत्र मात्र कमी होणार आहे. यात गेल्या वर्षी गव्हाचे 1 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्र होते. यावर्षी अवघ्या 45 हजार हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र होऊ शकते. त्यामुळे गव्हाचे क्षेत्र हे सरासरी 30 टक्के कमी होण्याचा अंदाज आहे.

कपाशी, खोडव्याच्या जागेवर गहू, कांदा !
कृषी विभागाने रब्बीची मुबलक बियाणे उपलब्ध केलेले आहे. तसेच रासायनिक खतांचा साठादेखील पुरेसा आहे. मात्र अजूनही बियाणे खरेदीचे धाडस शेतकरी करताना दिसत नाही. त्यामुळे कृषी केंद्रातच बियाणे, खते पडून आहेत. कपाशी गेल्यानंतर किंवा खोडवा तुटून गेल्यावरच पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकरी गहू किंवा कांद्याचा विचार करणार आहे.

कोणते व किती बियाणे उपलब्ध : ज्वारी 4656, गहू 8006, हरभरा 8677, करडई 50, मका 5159, एकूण 26548 (क्विंटल)

या वर्षी शेती पाण्याच्या समस्येमुळे गहू आणि कांद्याचे क्षेत्र घटण्याचा अंदाज आहे. शेतकर्‍यांनी आपल्याकडील उपलब्ध पाण्याचा तसेच उन्हाळी आवर्तनाचा विचार करूनच रब्बीची पिके घ्यावीत. कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.
                             – नीलेश कानवडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद

जायकवाडीचे भूत पुन्हा मानगुटीवर!
जिल्ह्यातील सर्वच धरणांत मुबलक पाणीसाठा असला तरी जायकवाडीचे भूत यंदाही नगरकरांच्या मानगुटीवर आहे. त्यामुळे नगर जायकवाडीला पाणी गेल्यास उन्हाळ्यातील आवर्तनावर त्याचा परिणाम होणार आहे. परिणामी, शेतकरी रब्बी पिकांसह ऊस लागवडीबाबतही विचार करूनच निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT