अहमदनगर

पिंपळनेर शाळेची मॉडेल स्कूलकडे वाटचाल; एनजीओ, ग्रामस्थांच्या मदतीला यश

Laxman Dhenge

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा परिषद शाळेचे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लोकसहभाग व कमिन्स इंडियाच्या सीएसआर फंडातून ऐक्य सेवा सेंटरचे तुकाराम वाखारे यांच्या माध्यमातून रूपडे पालटत आहे. सुसज्ज वर्गखोल्यांसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, यासाठी 40 ते 50 लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे. सुशोभीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, शाळेची मॉडेल स्कूलकडे वाटचाल सुरू आहे.

पिंपळनेर येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे. शाळेची 1923 रोजी स्थापना झाली होती. हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या शाळेत 63 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच देवेंद्र लटांबळे, माजी सरपंच सुभाष गाजरे, मुख्याध्यापक रामराव पवार यांनी पुढाकार घेत, ऐक्य सेवा मंडळाचे तुकाराम वाखारे यांच्या माध्यमातून 40 लाख रूपयांचा निधी, तसेच ग्रामपंचायत, लोकसहभाग यातून 10 लाख रूपये, असा 45 ते 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला.

शाळेच्या चार वर्ग खोल्या, कुंपन, कमान, शाळेची संपूर्ण काचेची इमारत, रंगरंगोटी, संगणक आदींसाठी खर्च करण्यात येत आहे. हे काम जुलै महिन्यात सुरू झाले होते. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण मिळावे, यासाठी ग्रामस्थ देखील पुढे आले आहेत. मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा यात सहभाग आहे. शाळेचे सुरू असलेले काम पाहून आसपासच्या गावातील ग्रामस्थ अवाक् होत आहेत.

दर्जेदार शिक्षणासाठी प्रयत्न : लटांबळे

इंग्रजी माध्यमांना पालकांचे पैसे खर्च होतात. तेथे भौतिक सुविधा असतात, मात्र दर्जेदार शिक्षण मिळेल, याची शाश्वती नसते. जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधा, अनुभवी शिक्षक साथ मिळाली, तर इंग्रजी शाळांना मागे टाकले जाईल. गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आपण प्रयत्न करत आहोत, असे सरपंच देवेंद्र लटांबळे यांनी सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT