अहमदनगर

भारत रथयात्रेला मढीत विरोध; संतप्त शेतकर्‍यांपुढे अधिकार्‍यांची उडाली भंबेरी

Laxman Dhenge

मढी : पुढारी वृत्तसेवा : विकास, महागाई, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर क्रेंद्र सरकारचे ठोस धोरण नाही, इडीची छापे शेतकर्‍यांच्या घरांवर टाका, मग शेतकरी किती कर्जबाजरी आहे, ते कळेल. कांद्या ,दुध व कापसाला भाव नाही, अशा प्रश्नांचा भडीमार करीत मढी येथील बाळासाहेब मरकड या युवा शेतकर्‍यासह युवकांनी विकसित संकल्प भारत यात्रेचा रथाला मढी येथे विरोध केला. केंद्र सरकार राज्य सरकारच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. मढी येथे हा रथ आला असता, ग्रामसेवकाने निमंत्रित केलेल्या ग्रामस्थांच्या हातात योजनांचे फलक होते.

एका वाहनावरील स्क्रीनवर उज्ज्वला गॅससह विविध योजनांची माहिती दिली जात होती. यावर युवा शेतकरी बाळासाहेब मरकड यांनी जोरदार आक्षेप घेतला. आमचे संपूर्ण गाव कांदा उत्पादक असून, रात्रीत सरकारने निर्यात बंदी केली आणि चाळीस रुपये किलो दर असलेला कांदा दहा रुपयांवर आला. मग नेमका या यात्रेचा उद्देश काय? शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विकास, महागाई, शेतकर्‍यांचे प्रश्न यावर काहीच धोरण नाही, दुधाचे भाव काय झाले, दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत आहेत. मागील वर्षीचे कांदा अनुदान अद्याप मिळाले नसून, नियमित कर्जफेड करणार्‍यांना आर्थिक लाभ कधी होणार? ईडीचे छापे शेतकर्‍याच्या घरावर टाका, मग कळेल शेतकरी किती अडचणीत आहे ते, अशा प्रश्नांच्या भडीमाराने अधिकारी व कर्मचार्‍यांची भंबेरी उडाली. यावेळी असिफ शेख, पोपट घोरपडे आदी शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT