छगन भुजबळ. ( संग्रहित छायाचित्र )
नगर : पुढारी वृत्तसेवा : ओबीसींमधील आमदार-खासदार तथा लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या मतांमुळे घाबरतात. त्यामुळे ते ओबीसी आंदोलनात येत नाहीत. मराठा समाजाची मते हातून निसटतील, अशी भीती त्यांनी वाटते, असा घणाघात करतानाच मी आधीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी येथे ओबीसी महामेळाव्यात केला.
'या भुजबळांना मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला', असे म्हणणार्या आणि राजीनामा देण्याचा सल्ला मला विरोधी आणि स्वपक्षातीलही अनेकजण देतात.
मात्र, ओबीसींची पहिली रॅली अंबड येथे काढली, त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबरलाच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला 'वाच्यता करू नका', असे सांगितल्याने आतापर्यंत गप्प होतो, असे ते म्हणाले. मी ओबीसींसाठी शेवटपर्यंत लढणार, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याच्या विरोधात शनिवारी येथे झालेल्या ओबीसी एल्गार महामेळाव्यात ते बोलत होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे आम्हीही म्हणतो. मात्र, ते स्वतंत्र द्या. ओबीसींमधूनच आरक्षण द्या हा मराठ्यांचा आग्रह अनाकलनीय आहे. त्यांनी झुंडशाहीने आरक्षण घेतले आहे. ओबीसींच्या विरोधात गावागावांत दरी निर्माण केली जात आहे. त्यामुळे धनगर, वंजारी, माळी अशा सर्वांनी झुंडशाहीच्या विरोधात एकत्र येऊन लढावे लागेल, असे आवाहन भुजबळांनी केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले, मग 'ते' पुन्हा कशासाठी उपोषण करणार आहेत, असा सवाल करून भुजबळांनी मनोज जरांगे यांचा नामोल्लेख न करता टीका केली.
मंडल आयोगच संपविण्याची भाषा करणार्या जरांगेंचा समाचार घेताना ते म्हणाले, मंडल आयोग संपविला, तर मंडल आयोगाकडूनच मिळालेले ओबीसींचे आरक्षणही संपेल. मग त्यांना मिळालेले ओबीसी आरक्षणही राहणार नाही, एवढेही त्याला कळत नाही.
ओबीसींमधील आमदार-खासदार तथा लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या मतांमुळे घाबरतात. त्यामुळे ते ओबीसी आंदोलनात येत नाहीत. मराठा समाजाची मते हातून निसटतील, अशी भीती त्यांनी वाटते. वास्तवात 80 टक्के मते ओबीसींचीच आहेत, असे सांगून आंध्र प्रदेश, झारखंड आणि बिहारसारख्या राज्यांनी जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला, तशी जातनिहाय जनगणना राज्यात आणि संपूर्ण देशातही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यांची हजामत करू नका
मराठा आरक्षण मिळाल्यानंतर परभणी येथे विजयी मिरवणुकीवेळी ओबीसी महिलांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. त्यांच्या घरापुढे रात्रभर डीजे वाजवला. दहशत माजविली. एका गावात त्यांनी ओबीसी व्यक्तीच्या दुकानात जाऊ नका, असे सांगितले. मग त्यांच्यापैकी एकाचीही हजामत करू नका, असे आम्ही नाभिकांना सांगितले तर, असा सवाल त्यांनी केला.
आरक्षण मिळाले, मग सर्वेक्षण कशासाठी़?
शपथपत्रावर खोटी वंशावळ सांगून, चुकीची प्रमाणपत्रे दिली जात आहेत. दारात गाड्या उभ्या असलेलेही झोपडीत राहतो, असे सांगत आहेत. सर्वेक्षणात 180 प्रश्न असताना एका दिवसात एकजण 25 ते 50 घरांचे सर्वेक्षण कसे करू शकतो, असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जामखेडमध्ये सगळे कुणबी आहेत, सोलापूरच्या एका गावात खाडाखोड करून दाखल्यांवर मराठा कुणबी असे लिहिलेले आढळले, असे आरोपही त्यांनी केले.
तरुणाचा धिंगाणा, पोलिस अधीक्षक जखमी
या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाषण सुरू असताना एका तरुणाने गर्दी घुसून चिथावणीखोर घोषणाबाजी सुरू केली. यावेळी सभेला उपस्थित असणार्यांनी नागरिकांनी त्याला चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी तत्काळ घनास्थळी धाव घेत त्या तरुणाला तेथून बाजूला नेले. यावेळी गर्दीतील लोकांनी तरुणावर दगडव पाण्याच्या बाटल्या फेकल्या. त्यात खैरे किरकोळ जखमी झाले.
भुजबळ उवाच…
ओबीसीतून मराठा आरक्षणाचा आग्रह अनाकलनीय
झुंडशाही संपवण्यासाठी ओबीसींनी एकत्र यावे
जातनिहाय जनगणना राज्यासह देशातही करावी
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.