अहमदनगर

अभय योजनेकडे थकबाकीदारांची पाठ; योजनेला 1 टक्काही प्रतिसाद नाही

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

महावितरणच्या विलासराव देशमुख अभय योजनेेकडे जिल्ह्यातील कायमस्वरूपी थकबाकीदारांनी पाठ फिरवली आहे. वीजपुरवठा खंडित असलेल्या 1 लाख 89 हजार 799 ग्राहकांपैकी अवघ्या 1 हजार 31 ग्राहकांनी वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील केवळ 171 ग्राहक थकबाकीमुक्त झाले आहेत.

या कायमस्वरूपी थकबाकीदार 1 लाख 89 हजार 799 ग्राहकांकडे महावितरणची मूळ थकबाकी 116 कोटी 58 लाख आहे. त्यावरील व्याज व दंडाची 18 कोटी 79 लाखांची सूट देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. मात्र, या योजनेस जिल्ह्यात 1 टक्काही ग्राहकांचा प्रतिसाद मिळालेला नाही. आजपर्यंत 171 ग्राहक योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त झाले. त्यांनी 21 लाख 12 हजार रुपये भरले असून त्यांची वीज पुन्हा जोडण्यात आली आहे.

महावितरण सातत्याने थकबाकी वसुलीसाठी वेगवेगळे उपाय व योजना योजते. परंतु काही ग्राहक या सर्व उपाययोजनांना योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे सर्वसंधी देऊनही वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करावा लागतो. विलासराव देशमुख अभय योजनेचा कालावधी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू असेल. योजनेत थकबाकीदार ग्राहकांना थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरावी लागेल. त्यामुळे त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात येईल.

थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना 5 टक्के व लघुदाब ग्राहकांना 10 टक्के थकीत मुद्दल रकमेत अधिकची सवलत मिळेल. ग्राहकांना रक्कम सुलभ हप्त्याने भरावयाची असल्यास मुद्दलाच्या 30 टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे व यानंतरच त्यांना उर्वरित रक्कम 6 हफ्त्यांत भरता येईल. लाभार्थी ग्राहकाने उर्वरित हफ्ते भरले नाही, तर पुन्हा माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू होईल. ज्या ग्राहकांचा कोर्टात वाद चालू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ही योजना फ्रेंचायसीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असेल. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी व माहितीसाठी महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT