रुईछत्तीशी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सध्या नगर-सोलापूर मार्गावरून वारकरी हरिनामाचा गजर करत पंढरीला जात आहेत. नगर -सोलापूर मार्गावर त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर निवृत्तीनाथ पालखीचे आगमन झाले असता, त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जवळपास 50 दिंड्या एकत्र घेऊन हा पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ होतो. मार्गावरून ही दिंडी जाताना काही काळ वाहनांची कोंडी झाली होती. दरेवाडी, वाळुंज, पारगाव, शिराढोन गावात पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
मार्गावर जागोजागी आरोग्य सुविधा देण्यात आल्या आहेत. निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यातील सर्व वारकर्यांसाठी तालुका प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली होती. गावोगावी ग्रामस्थांकडून वारकर्यांना राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. रस्त्यावरून वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळवण्यात आली आहे. नगर तालुका पोलिस प्रशासन रस्त्यावर पहारा देत आहेत. रस्त्याच्या बाजूने विसावा घेण्यासाठी तंबू देण्यात आले आहेत. मार्गावरून जाणारी सर्वात मोठी दिंडी असल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रशासन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून या मार्गावर जिल्हाधिकार्यांनी पाहणी करून नियोजनाची तयारी केली होती.
दहिगाव – साकत गावीही दिंडी मुक्कामी असून, येथील ग्रामस्थांनी वारकर्यांची राहण्याची चांगली सोय केली आहे. पालखी सोहळा व्यवस्थापण समितीकडून मार्गावरील गावांचे आणि जिल्हा प्रशासनाचे कौतुक करण्यात आले. निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याने पंढरीची वाट दुमदुमून टाकली आहे. रस्त्यावरील गावांना विठूनामाचा गजर रोज ऐकू येत असल्याने वातावरण संपूर्णपणे भक्तिमय होऊन गेले आहे.
हेही वाचा