पाथर्डी शहर : पावसामुळे शहरातील मुख्य अजंठा चौकात पथदिव्याच्या विजेचा धक्का बसून एका मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागला. याची पालिका प्रशासनाने गंभर दखल घेऊन शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
पालिका प्रशासानाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पथदिव्यांमधील वीज प्रवाहाचा धक्का बसून एका मुक्या प्राण्याला जीव गमवावा लागला. बंद पथदिव्यांमध्ये विद्युत प्रवाह वाहत असल्याने मोठी दुर्घटना शहरात घडू शकते. अशा घटनांची शक्यता पाहता शहरातील सर्व पथदिवे पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत. शहरात अनेक ठिकाणी लहान मुले पथदिव्यांच्या आसपास खेळत असतात विद्युत प्रवाह या खांबात आल्यावर मोठी दुर्घटना घडू शकते. दुर्दैवी घटना घडू नये, म्हणून सर्व पथदिव्यांची चाचणी करून उपाययोजना करण्यात याव्यात. जेणेकरून शहरातील नागरिक सुरक्षित राहतील, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेच्या वतीने लवकरच सर्व पथदिव्यांची व इतर विद्युत प्रवाह गळती असलेल्या ठिकणाची दुरुस्ती करू, असे आश्वासन देण्यात आले.पालिकेचे प्रशासन अधिकारी आयुब सय्यद यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश रासने, देवा पवार, अतिश निर्हाळी, अक्रम आतार, अनिकेत निंगूरकर उपस्थित होते.