अहमदनगर : देशातील निरक्षरांची संख्या कमी करण्यासाठी केंद्र शासनाने नवभारत साक्षरता अभियान हाती घेतले आहे. विशेष म्हणजे या साक्षरता मोहिमेत केवळ खडू-फळा पद्धत नसेल, तर यात मोबाईल असेल फळा आणि त्यावर लीलया फिरणारी प्रत्येकाची बोटे म्हणजे खडू! त्यासाठी सरकारने खास 'उल्लास' नावाचे अॅप विकसित केले आहे. त्यामुळे आता निरक्षरांना मोबाईलवरील हे 'उल्लास' ग-म-भ-न शिकविणार आहे… केंद्र सरकारने 2022-27 या पाच वर्षांच्या कालावधीत नवभारत साक्षरता अभियान हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात 15 ते 35 वयोगटातील निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट आहे.
वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि जीवनकौशल्य विकसित करणारे शिक्षण देऊन 'साक्षरतेकडून समृद्धीकडे' जाण्याचा मार्ग या निरक्षरांना दाखविला जाणार आहे. पहिल्या दोन वर्षांत महाराष्ट्र राज्यात अशाप्रकारे तब्बल 12 लाख 40 हजार निरक्षरांना साक्षर करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात अशा निरक्षरांची एकूण संख्या 98 हजार असून, पहिल्या दोन वर्षांत साक्षरतेचे उद्दिष्ट 43160 जणांचे आहे.
केंद्र सरकारने नवभारत साक्षरता अभियानाच्या माध्यमातून निरक्षरांना साक्षर करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार निरक्षरांची संख्या ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 2022-23 आणि 2023-24 या दोन वर्षांसाठी 12 लाख निरक्षरांना साक्षर करण्यासाठी प्रशासन काम करणार आहेत. 31 ऑगस्टपर्यंत निरक्षरांचे हे सर्वेक्षण सुरू असणार आहे. त्यानंतर मोबाईल आणि लॅपटॉप-कॉम्प्युटरच्या साह्याने निरक्षरांना पायाभूत शिक्षण दिले जाणार आहे.
त्यासाठी एक अॅप विकसित केले असून, त्याला 'उल्लास' (णपवशीीींरपवळपस ङळषशश्रेपस ङशरीपळपस षेी अश्रश्र ळप डेलळशीूं-णङङअड) हे नाव दिले आहे. अक्षरओळख, अंकज्ञान तसेच मोबाईल वापराच्या माहितीसह एकूणच साक्षरता अभियान डिजीटल होत आहे. त्यासाठी 10 निरक्षरांमागे एक सेवाभावी शिक्षक दिला जाणार आहे. त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग ः डाएट) माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शासनाच्या निर्देशनानुसार निरक्षरांना साक्षर करण्यासाठी अभियान राबविले जात आहे. या अभियानातून निरक्षरांना पायाभूत शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी मोबाईलवर 'उल्हास' अॅप विकसित करण्यात आले आहे. पहिल्या दोन वर्षांत जिल्ह्यात 43 हजार जण साक्षर करण्याचे आपल्याला उद्दिष्ट मिळाले आहे.
– एस. के. सरवदे, उपशिक्षणाधिकारी, योजना विभाग
हेही वाचा