अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : अकोले शहरातील समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलने संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करून चुकीच्या पद्धतीने अवजड व हलके वाहन चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि वाहन चालक परवाने दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा (परवाना) लायसन्स नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निलंबित केल्याची माहिती श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी गणेश डगळे यांनी दिली आहे.
अकोले व राजूर शहरांत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मोटार ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू आहेत. दरम्यान, याकडे श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे ( एआरटीओ) दुर्लक्ष होत असून अप्रमाणित, अप्रशिक्षित ड्रायव्हिंग स्कुलमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अकोले तालुक्यामध्ये अनेकांनी वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी काही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला आहे. पण श्रीरामपूर,कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर, नेवासा आणि अकोले तालुक्यात काही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये श्रीरामपूर उपप्रादेशिक वाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीमध्ये हे गंभीर वास्तव समोर आले. त्यानंतर तात्काळ ही बाब नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वरिष्ठांच्या निदर्शनात पुराव्यानिशी आणून दिली. यामध्ये चुकीच्या पद्धतीने अवजड वाहन चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र देणे, अवजड वाहन चालकांना हलके प्रशिक्षण वाहनावर प्रशिक्षण देणे, लायसन्स प्रलंबित ठेवणे अशा अनेक गंभीर बाबी आढळून आल्या . परिणामी राजूर येथील एक ड्रायव्हिंग स्कूलचा परवाना तात्पुरता निलंबित केला होता.
तसेच अकोले शहरातील समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूलने संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करून चुकीच्या पद्धतीने अवजड व हलके वाहन चालक प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि वाहन चालक परवाने दिल्या प्रकरणी त्यांचे लायसन्स नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने निलंबित केल्याची माहिती श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी गणेश डगळे यांनी दिली आहे.
हेही वाचा: