अहमदनगर

ऐन पावसाळ्यात नगर तालुका तहानलेलाच!

अमृता चौगुले

शशिकांत पवार :

नगर तालुका :  रोहिणी, तसेच मृग नक्षत्र पूर्णतः कोरडेच गेले. आर्द्रा नक्षत्रात थोड्याफार प्रमाणात सरी बरसल्या. पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली, तरी अद्यापि नगर तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाच नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या जाणवत असून, सद्यस्थितीत 11 गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. चिचोंडी पाटील येथील टँकरलाही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच आणखी काही गावांचे टँकरसाठी प्रस्ताव येत आहेत.

पावसाळा सुरू होऊन सुमारे दीड महिना झाला, तरी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. छोटे-मोठे तलाव कोरडे पडले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक गावांतील वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. भर पावसाळ्यात अकरा गावांनी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, इमामपूर सारख्या गावांचे पिण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव नव्याने येत आहेत. आर्द्रा नक्षत्रात पेरणी योग्य पाऊस झाला नसल,ा तरी शेतकर्‍यांनी वर्षाचे गणित डोळ्यासमोर ठेवत पाऊस होईल, या अपेक्षेवर सुमारे 35 ते 40 टक्के पेरण्या उरकल्या आहेत. सुरुवातीलाच पावसाने हिरमोड केल्याने मुगाच्या पेरणीवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. पेरणी केलेल्या पिकांना पावसाची नितांत गरज आहे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकर्‍यांवर येणार असल्याचे चित्र दिसून येते.

नगर तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगररांगा मोठ्या प्रमाणात विखुरल्या आहेत. त्यामुळे भौगोलिक रचनेनुसार तालुक्यातील 110 गावांपैकी अनेक गावे डोंगर उतारावर वसलेली आहेत. डोंगर उतारावरील गावांना कितीही पाऊस झाला, तरी उन्हाळ्यात पाण्याची दुर्भिक्ष्य जाणवते, ही परिस्थिती आहे. या गावांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्यासाठी भटकंती सुरू होत असते. तालुक्यात सरासरी 85 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ओढे, नाले, बंधारे, तलाव कोरडे ठाक आहेत. अनेक गावांनी पाण्यासाठी भटकंती सुरू आहे, तर शेतकरी वरूणराजाची आस लावून बसला आहे.

भूजल पातळीत वाढ झाली नसल्याने पिण्याचे पाणी तसेच पशुधन जगविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरू आहे. आर्द्रा नक्षत्रातील हलक्या सरींवर पेरणी झालेल्या पिकांना पुनर्वसू झालेल्या सरींनी नवसंजीवनी मिळाली आहे. परंतु पिकांना अद्यापि पावसाची गरज आहे. जोरदार पाऊस होऊन नदी, नाले खळाळून वाहून पिण्याच्या पाण्याचा, तसेच शेतीचा प्रश्न मिटावा, यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत तालुक्यातील नागरिक आहेत.

येत्या नक्षत्रात समाधानकारक पाऊस होईल, या आशेवर शेतकरी आपले गणित मांडत आहे. परंतु पावसाने हिरमोड केल्यास तालुक्यातील शेतकर्‍यांसमोर यक्षप्रश्न उभा राहणार आहे. मागील वर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीने वाया गेला, तर रब्बी हंगाम गारपीट, ढगाळ वातावरण तसेच कवडीमोल बाजारभाव, यामुळे शेतकर्‍यांसाठी संपूर्ण वर्ष तोट्यातच गेले. त्याची भरपाई यावर्षी होईल, या अपेक्षेवर शेतकर्‍यांनी पेरणी केली. परंतु एकंदरीत तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. शेतीसाठी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असल्याचे विदारक चित्र निर्माण झालेले आहे.

या गावांना होतोय टँकरने पाणीपुरवठा
मदडगाव, सांडवे, भोयरे पठार, दशमी गव्हाण, भोयरे खुर्द, बहिरवाडी, नारायणडोहो, माथणी/बाळेवाडी, उक्कडगाव, ससेवाडी, कोल्हेवाडी,

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT