अहमदनगर

Nagar News : अवैध दारूविक्री जोमात, सर्वसामान्य कोमात!

Laxman Dhenge

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारूविक्री राजरोसपणे चालू आहे. गावोगावी शहरातील मुख्य रस्त्यावर, चौकाचौकात अवैध दारू धंदे तेजीत आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. खुलेआम मोक्याच्या ठिकाणी चालणार्‍या या अवैध दारूविक्रीमुळे तरुणाई वाईट मार्गाला जात आहे. या व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात असून, या अवैध व्यवसायाला खतपाणी घालणार्‍यांचीही चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यांचे जाळे पसरले आहे. ऊसतोड मजुरांबरोबरच शेतकरीही अवैध दारूविक्रीला बळी पडत आहे. यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. विविध ठिकाणी राजरोसपणे हा व्यवसाय सुरू आहे. चौकात ठिकठिकाणी दारुड्यांचे आपापसांत होणारे वाद व शिवीगाळ तर नित्याचीच बाब बनली आहे. जोमाने फोफावलेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

…अन्यथा आंदोलन!

परिसरात गेल्या तीन महिन्यांत ठोस कारवाई कुठेही झाली नाही. राज्य उत्पादन शुल्क विभाग या व्यवसायाला खतपाणी घालत आहे. लवकरात लवकर अवैध दारूविक्रीवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT