Crime 
अहमदनगर

Nagar Crime News : पत्नीचा खून करुन पतीने मृतदेह पुरला

Laxman Dhenge
श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून पतीने पत्नीची थंड डोक्याने हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह घराजवळच खड्डा खोदून पुरला. खड्ड्याच्या उकरलेल्या ताज्या मातीमुळे या खुनाचा उलगडा झाला अन् आरोपी पती पसार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रूपाली ज्ञानदेव आमटे (वय 24, रा. पारगाव सुद्रिक, ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे मयत विवाहितेचे नाव असून, ज्ञानदेव पोपट आमटे (वय 28) असे आरोपी पतीचे नाव आहे. याबाबत रूपालीचा भाऊ रोहित संतोष मडके (रा. फक्राबाद, ता. जामखेड) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मडके यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ज्ञानदेव आमटे बांधकाम व्यावसायिक असून, त्याचे दौंड, शिरूर, पुणे परिसरात कामे सुरू आहेत. मागील महिन्यांत मयत पत्नी रूपाली हिस पती ज्ञानदेव याचे बाहेरच्या दोन महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे समजले होते.

दरम्यान, आमटे दाम्पत्य 9 नोव्हेंबर रोजी विवाह सभारंभासाठी जामखेड येथे गेले होते. 10 नोव्हेंबर रोजी सकाळी रूपाली व आईचे फोनवर बोलणे झाले. रोहित याने दुपारी अडीच वाजता आरोपी ज्ञानदेव याच्याशी संपर्क साधून गावी किती वाजता पोहचले, अशी विचारपूस केली.

त्यावर आरोपी ज्ञानदेव आमटे याने रूपाली हिला श्रीगोंदा येथे ब्युटी पार्लरच्या क्लाससाठी सोडले आहे. संध्याकाळी घेऊन येणार आहे, असे सांगितले. मात्र, त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रूपाली ही घरी आली नाही. ही माहिती ज्ञानदेव याने रोहितला दिली. रोहित जामखेडवरून श्रीगोंद्यात पोचला. रोहित मडके व आरोपी ज्ञानदेव आमटे यांनी एकत्रित रूपालीचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. 11 नोव्हेंबरला ज्ञानदेव याने पत्नी हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली. दरम्यान, रूपालीचा शोध सुरू असताना आरोपी ज्ञानदेव आमटे याने जो घटनाक्रम सांगितला, त्यानुसार पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

मात्र, त्यामध्ये रूपाली श्रीगोंदा येथे गेली नसल्याचे समोर आले. तपास सुरू असताना शुक्रवारी (दि.17) सकाळी रोहित मडके हे पारगाव सुद्रिक येथील आमटे याच्या घराजवळ फिरत असताना त्यांना आसपास उकरलेली ताजी माती दिसली. जवळच एक खड्डाही दिसला. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा उकरला असता, मयत रूपालीचा मृतदेह कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला.

दरम्यान, पोलिसांनी रोहित मडके याच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानदेव आमटे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर रूपालीचा खून कसा झाला हे समोर येईल. पोलिस आरोपी ज्ञानदेव आमटे याचा शोध घेत आहेत. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग करीत आहेत.

मोबाईल बंद करून आरोपीचे पलायन

फिर्यादी रोहित मडके याने आरोपी ज्ञानदेव यास फोन करून घराजवळ खड्डा असून, काहीतरी पुरल्याचे दिसते. तुम्ही कुठे आहात? यायला किती वेळ लागेल, असे विचारले. त्यावर आरोपी ज्ञानदेव आमटे याने मी शिरसगाव फाटा येथे आहे. एक तासात आलोच, असे म्हणत फोन ठेवला अन् लगेच फोन स्विच ऑफ केला, असे पोलिस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा

Pune News : पालिकेचा पर्यावरण अहवाल म्हणजे 'कट पेस्ट'?

Pune News : जलसंपदाच्या जागेवर पोसणार बिल्डर

Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT