अहमदनगर

Nagar Crime News : अखेर कापूस चोरणारी टोळी केली गजाआड

Laxman Dhenge

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : सध्या कापसाचे सीजन चालू आहे. राहुरी तालुक्यात कापूस चोरीच्या घटनेत वाढ झाली. राहुरी पोलिस पथकाने तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात कापूस खरेदी केंद्रातील कापूस चोरी करणारी 6 जणांची टोळी अवघ्या 24 तासाच्या आत गजाआड केली, मात्र चार चोर पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून जाण्यात यशस्वी झाले. देवळाली प्रवरा येथे अतुल नानासाहेब कदम यांच्या शिवतेज कापूस खरेदी केंद्र तर तेजस कदम यांच्या साईतेज कापूस खरेदी केंद्रातून 80 हजार 500 रुपये किंमतीचा साडे अकरा क्विंटल कापूस चोरी गेला होता.

22 नोव्हेंबर 2023 रोजी रात्रीच्या दरम्यान चोरी झाली होती. याप्रकरणी अतुल कदम यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवली. गुप्त खबर्‍याच्या माहितीनुसार जाधव, पो. ह. सूरज गायकवाड, पो. ना. राहुल यादव, नदीम शेख, सम्राट गायकवाड यांच्या पोलिस पथकाने आरोपींची धरपकड सुरु केली. अवघ्या 24 तासांच्याआत 6 चोरट्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मुस्क्या आवळून गजाआड केले. गुन्ह्यात वापरलेली टाटा एस. गाडी (क्र. एम एच 44- 8382) व ईनोव्हा गाडी (क्र. एम एच 01- ए सी- 4271) या दोन वाहने जप्त केली.

सराईत गुन्हेगार करण माळी याने कापूस चोरी करण्यास टोळी बनवली होती. त्यामध्ये पप्पू गुलाब बर्डे, ऋषिकेश मधुकर लोखंडे (वय 21), प्रज्वल सूर्यभान झावरे (वय 20), प्रज्वल अशोक भांड (वय 19), विनीत संजय कोकाटे (वय 18), अक्षय नारद, बन्नी बर्डे, प्रतीक बाळासाहेब बर्डे, सचिन रमेश बर्डे ऊर्फ सचिन टिचकुले अशा 10 जणांची टोळी बनवली होती.
पोलिस पथकाने प्रज्वल झावरे, ऋषिकेश लोखंडे, प्रज्वल भांड, विनीत कोकाटे, प्रतीक बर्डे, सचिन बर्डे उर्फ सचिन टीचकुले या 6 जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, मुख्य आरोपी करण माळी, पप्पु बर्डे, बन्नी बर्डे, अक्षय नारद हे चौघे पळून गेले. पुढील तपास पो. नि. धनंजय जाधव व पो. ह. राहुल यादव करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT