अहमदनगर

MLA Balasaheb Thorat : ‘नगर’ कोणी लढवायचं, हे ठरलेलं नाही! आमदार बाळासाहेब थोरात

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर लोकसभेची जागा पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस लढते. मात्र या वेळी ही जागा कोणी लढवायची, याबाबत अजून चर्चा झालेली नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमच्या तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, अशा शब्दात नगरचा सस्पेन्स आमदार बाळासाहेब थोरात यांनी वाढविला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नगर लोकसभा मतदारसंघ काँग़्रेसने लढवावा व या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन नगरची जागा राष्ट्रवादीच लढविणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे उत्कंठा वाढलेल्या नगरच्या जागेसंदर्भात बोलताना आमदार थोरात म्हणाले, की लोकसभेच्या जागावाटपाची अजून कोणतीही चर्चा झालेली नाही.

राज्यातील 48 जागांवर आमच्या तिन्ही मित्रपक्षांमध्ये चर्चा होईल. यातून जागावाटप होईल. यात नगरची जागा कोणी लढवायची यावर निर्णय होईल, असे स्पष्ट केले. मात्र नगरची जागा पूर्वीपासूनच राष्ट्रवादी लढवत असल्याचेही त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

नगरमधील गुंडगिरीचा बंदोबस्त करा

सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय आहे. मी यापूर्वीही नगरची वाढती गुंडगिरी रोखण्यासाठी विधानसभेत बोललो होतो. मात्र, कारवाई झाली नाही. आताही सरकारने व पोलिसांनी नगरमधील आपले अस्तित्व दाखविण्यासाठी या गुंडगिरीचा बंदोबस्त करावा, अशी सूचनाही या वेळी आमदार थोरात यांनी केली. किरण काळे यांनी केलेल्या अवैध धंद्याच्या स्टिंग ऑपरेशनचे त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनाही 'हा' प्रकार आवडणार नाही

पंतप्रधान नगरला येत आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. देशाचे ते प्रमुख पद आहे. त्यामुळे याविषयी दुमत नाही. मात्र पंतप्रधान येईपर्यंत कालव्याला पाणी न सोडणे, दर्शनबारी बंद ठेवणे, हे योग्य नाही. तसेच कार्यक्रमासाठी लोकांना आणण्याचे टार्गेट देणे, शाळांना सुटी देणे, हा प्रकार पंतप्रधानांनाही आवडणार नाही, अशी टीका आमदार थोरात यांनी विखे पाटलांचे नाव न घेता केली.

'समन्यायी'च्या सूत्राचा पुनर्विचार व्हावा!

यंदाचे वर्ष दुष्काळाचे आहे. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्यासाठीच्या समन्यायी पाणीवाटप सूत्राचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे. समन्यायी म्हणजे सर्वांना समान न्याय. मात्र आजचे समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र योग्य नाही. त्या वेळी लोकप्रतिनिधींना विचारून ते सूत्र तयार करायला हवे होते. मात्र ते अधिकार्‍यांनीच केले. आता यात बदल व्हायला हवा, अशी अपेक्षा आमदार थोरात यांनी व्यक्त केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT