अहमदनगर

शेवगावमध्ये मारहाण करून 40 हजारांची लूट; कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात

अमृता चौगुले

शेवगाव: बेदम मारहाण करून अज्ञात 40 हजार रुपयांची लूट केल्याची घटना शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर राक्षी शिवारात घडली असून, या भामट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी तातडीने केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये इतर दरोड्यातील दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले आहेत.

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर तालुक्यातील राक्षी येथील महादेव देवराव घनवट हे गुरुवार (दि.9) रात्री 11 वाजता आपल्या दुचाकी वाहनाने घरी जात असताना शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर राक्षी शिवारातील कानिफनाथ मंदिराशेजारी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यातील एकाने लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर मारून त्यांना जबर जखमी केले. तुझ्याकडे जे आहे, ते दे नाही, तर जीवे मारू, अशी धमकी देत घनवट यांच्या खिशातील 30 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड असा 42 हजार रुपयांचा ऐवज काढून चोरटे पळून गेले.

काही वेळाने राक्षी येथील महंमद शेख व ज्ञानेश्वर झुंबड शेवगाव येथून राक्षीकडे जात असताना त्यांना घनवट हे रस्त्यावर जखमी अवस्थेत दिसल्याने त्यांनी त्यांना शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याबाबत शेवगाव पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि रवींद्र बागूल करीत आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सपोनि रवींद्र बागूल, सपोनि आशिष शेळके, सपोनि विश्वास पावरा यांच्यासह 15 पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तत्काळ तालुका व जिल्हा नाकेबंदी केली.

पोलिस ठाणे हद्दीत रेकॉर्डवर असणार्‍या सर्व गुन्हेगांराना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दरम्यान अधिक तपास करता तालुक्यात झालेल्या एका दरोड्यातील गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT