अहमदनगर

शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण त्वरित द्या : आ.कानडे

अमृता चौगुले

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : जरांगे पाटील यांना पुन्हा आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची वेळ आली, हे शिंदे- फडणवीस सरकारचे अपयश आहे, अशी टीका करीत शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी आ. लहू कानडे यांनी केली. वास्तुतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याआधी त्यावेळच्या आघाडी सरकारने मराठा समाजाला 10 टक्के तर मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण दिले होते. सत्तांतरानंतर 2014 ला फडणवीस मुख्यमंत्री झाले व त्यांनी मुस्लिम समाजाचे आरक्षण स्थगित ठेवून मराठा समाजास टिकणारे आरक्षण द्यायचे म्हणून विधेयक आणले.

सर्वच पक्षाचे आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. या आरक्षणाला न्यायालयात चॅलेंज केले गेले. तथापि, उच्च न्यायालयानेही त्यास मान्यता दिली, परंतु अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते व मेरिट अँड मेरिट सेव्ह नेशन अशा काही संस्थांनी सुप्रीम कोर्टात मोठ्या वकिलांची फौज उभी करून, हे आरक्षण हाणुन पाडल्याचे समजते. या सर्वांच्या पाठीमागील बोलाविते धनी कोण आहेत, याची माहिती समाजातील सर्व शिक्षित व इंटरनेट फ्रेंडली युवकांना माहित आहे, असे सांगत आ. कानडे म्हणाले, या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने मोठी आंदोलने केली. आंदोलकांनी संयम, शांतता, नियोजन व सुसंस्कृतपणाचा आदर्श जगासमोर ठेवला.

जरांगे पाटील यांच्या शांततामय आंदोलनाला शिंदे-फडणवीस सरकारच्या पोलिसांनी गालबोट लावले. निरपराध व निष्पाप आंदोलकांवर लाठी चालवली, अश्रुधूर सोडला. हे कमी म्हणून की काय, बंदुकीमधून रबरी छर्रेही उडविल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये नोंद आहे. या अमानुषतेमुळे आंदोलन चिघळले ा मुख्यमंत्र्यांना आंदोलनस्थळी येऊन महिन्याभरामध्ये प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन द्यावे लागले. दस्तूरखुद्द राज्याच्या प्रमुखांनी उपस्थित राहून आश्वासन दिल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न आता निश्चितच सुटेल, अशी सर्वांची अपेक्षा होती,

परंतु मुदत संपून वर 10 दिवस झाले असताना आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवल्याने जरांगे पाटलांसह सर्व बांधव निराश झाले. मराठवाड्यात आजपर्यंत 6 मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. हे अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे, अशी खंत व्यक्त करून, शब्द दिल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका आहे. येत्या नागपूर अधिवेशनात आश्वासन पाळले न गेल्याने वैफल्यग्रस्त मराठा बांधवांनी केलेल्या आत्महत्यांबाबत आम्ही सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मराठा बांधवांनी अधिक आत्मकलेश करून न घेता नेहमीच्या लौकिकाप्रमाणे शांततामय मार्गाने आंदोलन करावे, अशी प्रार्थना करीत असल्याचे आ. कानडे म्हणाले.

काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईमध्ये एकत्र येणार..!

शिंदे- फडणवीस सरकारने सामाजिक स्वास्थ्य बिघडणारे जे अनेक प्रश्न
निर्माण केले, त्याबाबत विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार मुंबई येथे एकत्र येणार आहेत. राज्यपालांना भेटणार असल्याचे आ. लहू कानडे यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT