संगमनेर शहर: पुढारी वृत्तसेवा : संगमनेरमधील संजय गांधीनगर, वडार वस्ती येथील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. महायुती सरकार झोपडपट्टीधारकांचे पुर्नवसन करणार असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी केला. नगरपालिका प्रशासनाने भोगवटादार म्हणून कर वसुलीसाठी मागणीपत्र पाठवले असताना झोपडपट्टीवासीयांना असेसमेंट उतारा मिळणार आहे, असेे खोटे सांगून विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप अॅड. गणपुले यांनी केला आहे.
संजय गांधीनगर, वडार वस्ती येथील झोपडपट्टीधारकांना घरपट्टी लागू करून हक्काचा असेसमेंट उतारा मिळणार असल्याचे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटले होते. पार्श्वभूमीवर अॅड.गणपुले व जावेद जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. गणपुले म्हणाले, संजय गांधीनगर, वडार वस्ती येथील झोपडपट्टीधारकांची अनेक वर्षापासून पुर्नवसनाची मागणी आहे. त्यांच्यावतीने न्यायालयात लढा देत आहे.
महायुती सरकारचेही तसे प्रयत्न सुरू आहे. झोपडपट्टीधारकांकडून कर वसुली करण्याचे शासनाचे आदेश आहे. नगरपालिका प्रशासनाने झोपडपट्टीयांना कर वसुलीसाठी पत्र दिले आहे. पत्रात झोपडपट्टीधारकांचा भोगवटादार म्हणून उल्लेख केला आहे. भोगवटादार म्हणजेेे भडेकरू असतो. भाडेकरूची केव्हाही हकालपट्टी करता येते. त्यातून झोपडपट्टीधारकांना हक्काचा असेसमेंट उतारा मिळणार असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप गणपुले यांनी केला. नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत झोपडपट्टीधारकांकडून कर न आकारून त्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न बुडवल्याचा आरोप जावेद जहागीरदार यांनी केला.
हेही वाचा