जुन्नर : पुढारी वृत्तसेवा : राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्या सर्वांत उंच पुतळ्याचे भूमिपूजन करणे माझ्यासाठी अविस्मरणीय प्रसंग आहे, अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली. जगातील सर्वांत उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि सर्वांत उंच भगवा स्वराज्यध्वजाचे भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते गोद्रे (ता. जुन्नर) येथे करण्यात आले. त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, तहसीलदार रवींद्र सबनीस, संजय पानसरे, भगवान पोखरकर, अविनाश कर्डिले, सरपंच अनिता रेंगडे आदी उपस्थित होते. संभाजीराजे म्हणाले की, महिला सबलीकरण व आरक्षणवर नेहमी बोलले जाते; पण इतिहासात डोकावून पाहिले तर जिजाऊंनी महिला सबलीकरण तसेच महिलांनी स्फूर्ती, धाडस व मुलांवर संस्कार कसे करावेत, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून जिजाऊ मासाहेबांकडे पाहावे. माजी आमदार शरद सोनवणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
गोद्रे ग्रामस्थांनी स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विशेष आभार मानले. छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक या जुन्नर तालुक्यात उभारण्याचे माझे स्वप्न होते व ते आज साकार होत आहे, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. सोनवणे म्हणाले, छत्रपती शिवरायांचे जगातील पहिले सुवर्ण मंदिर या ठिकाणी आगामी तीन वर्षांच्या आत उभारण्यात येणार आहे. छत्रपतींचा पुतळा एक वर्षाच्या आत उभारण्यात येणार आहे. यामुळे रोजगारनिर्मिती व पर्यटनात वाढ होऊन विकास होणार आहे. आढळराव पाटील व आमदार बेनके यांनी या उपक्रमांस सहकार्य करणार असल्याचे सांगितले. श्रीमंत योगी स्मारक ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
हेही वाचा