अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर शहरापासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेवाडी (ता. नगर) गावात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बिबट्याचा मुक्तसंचार आहे. गुरुवारी (दि.17) एका शेतमजुरावर बिबट्याने हल्ला केला. सध्या गावात बिबट्याची दहशत सुरू आहे. जंगल सोडून मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याने सध्या अहमदनगर शहर परिसर आणि नगर तालुक्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.
तालुक्यातील सोनेवाडी (चास) गावात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मादी जातीच्या बिबट्याचा मुक्तसंचार आहे. बिबट्यासोबत त्याची दोन पिल्लेही आहेत. गावातील विविध वस्त्यांमध्ये या बिबट्याचे दर्शन होत असल्याचे गावकर्यांनी सांगितले. दरम्यान, काल (दि. 17) सकाळी पावणे नऊ वाजता नगर, सोनेवाडी (ता. नगर) परिसरात बिबट्याने नगर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे चालक किरण भुजबळ यांच्यावर हल्ला केला.
सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. डॉ.बोरगे यांचा चालक शेतीची मशागत करत होता. अचानक ट्रॅक्टरसमोर मादी बिबट्या समोर आला. ट्रॅक्टरच्या आवाजानं बिथरला. बिबट्या हल्ला करणार इतक्यात चालकाने प्रसंगावधान ओळखून ट्रॅक्टर जोरात मागे घेतला आणि मागच्या मागे पळून जात स्वतःचा जीव वाचवला. क्षणाचाही उशीर झाला असता, तर चालकाचा जीव धोक्यात आला असता. मात्र, सुदैवाने यामध्ये काहीही दुर्घटना घडली नाही.
सोनेवाडी परिसरात बिबट्याचा हा थरार अनेकांना पाहायला मिळाला. वनविभागाला स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासंदर्भात अनेकदा विनंती केली. यानुसार वन विभागाने परिसराची पाहणी करून बिबट्याचा संचार असलेल्या भागात पिंजरे लावले. मात्र, बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापि यश आले नाही.
सोनेवाडी भागात वनविभागांने बिबट्यासाठी पिंजरा लावला आहे. मात्र, त्या पिंजर्यात बिबट्या जात नाही. विशेष म्हणजे बिबट्याच्या शिकारीसाठी एक शेळीही ठेवण्यात आली आहे. तरीही बिबट्या पिंजर्यात गेला नाही. मात्र, सोनेवाडी परिसरात ट्रॅक्टरसमोर अचानक बिबट्या आला. बिबट्या वारंवार पिंजर्याला चकवा देण्यात यशस्वी होत आहे.
सोनेवाडी परिसरात बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. याबाबत वन विभागाने तातडीने उपाययोजना करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा.
– डॉ अनिल बोरगे, मनपा आरोग्य अधिकारी तथा रहिवासी सोनेवाडी
सोनेवाडीत सहा महिन्यांपासून मादी जातीच्या बिबट्या व तिच्या दोन पिल्लांचे गावकर्यांना दर्शन होत आहे. मोढवे शिवारात बिबट्याची दहशत जास्त आहे. वन विभागाचे प्रयत्न यशस्वी होत नाही. यामुळे गावात घबराटीचे वातावरण आहे.
– सुरेश सुंबे, अध्यक्ष, नगर तालुका खरेदी-विक्री संघ
हेही वाचा