आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी – अझमपूर येथील 46 वर्षिय व्यक्तीवर आज (रविवारी) सकाळी 9 वाजता दाढ खुर्द शिवारात बिबट्याने हल्ला केला, मात्र लोकांची तप्तर मदत मिळाल्याने त्यांचा जीव वाचला. राजेंद्र गीते घराकडून दाढ खुर्दच्या दिशेने सकाळी 9 वाजता दुचाकीवरुन मळ्यात जात होते. दाढ खुर्द शिवारात जि. प. शाळेजवळ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने राजेंद्र गीते यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गीते खाली पडले, मात्र सावध होत त्यांनी मोठ्याने आरडा – ओरड केल्याने आजु-बाजूच्या लोकांनी धाव घेतल्यामुळे बिबट्याने धूम ठोकल्याने त्यांच्या जीव वाचला.
राजेंद्र गीते यांच्या पायाच्या बोटाला दात लागल्याने किरकोळ जखम झाली. त्यांना प्राथमिक उपचाराकरिता दाढ खुर्द येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तेथून अ.नगर येथे हलविले. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले. संगमनेर तालुक्यात पुर्व भागात दाढ खुर्द, दाढ बु. , प्रतापपूर , खळी , पिंप्री लौकी अझमपूर , पानोडी , शेडगाव , शिबलापूर आदी परिसरात बिबट्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या. वनविभागाने त्वरीत बिबट्याचा बदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. दाढ खुर्द शिवारात महिन्यामध्ये ही दुसरी घटना असल्याने लोकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने त्वरीत पिंचरा लावून बिबट्यास जेरबंद करावे, अशी मागणी दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी यांनी केली आहे.
हेही वाचा