Laxman Hake Car Attack :
अहिल्यानगर : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर आज (दि. २७) सकाळी अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरूणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असताना हा प्रकार घडला आहे.
नगर-दौंड महामार्गावर अरणगावजवळ लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञात तरूणांनी काठ्यांनी हल्ला केला. हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून झाला याचा तपास पोलिस करत आहेत. हल्ला झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, याबाबत देखील पोलिस चौकशी करत आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत गणोशोत्सवात आंदोलन केले होते. या आंदोलनाला तसेच जरांगे-पाटील यांच्या मागणीला हाके यांनी विरोध केला. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आहे. त्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देणे अन्यायकारण असल्याची आक्रमकपणे भूमिका त्यांनी मांडली. यानंतर आपल्याला फोनद्वारे धमक्या अल्याचा दावा हाके यांनी केला होता. तसेच अन्य ओबीसी नेते हाके यांना साथ देत नसल्याचीही चर्चा होती. यानंतर त्यांनी एक भावनिक पोस्ट केली.
"मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रूंची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही," असे त्यांनी लिहिले आहे.