कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : सन 2010 ने 2022 या 12 वर्षांत नांदूरमधमेश्वर बंधार्यात वक्राकार 8 दरवाजे बसविल्यापासून आजअखेर ना गाळ हटला, ना पाणी साठा वाढला, मात्र मुळ प्रकल्पात गोदावरी डावा व उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व वैजापूर 4 तालुक्यांचे प्रचंड नुकसान झाले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नांदूरमधमेश्वर धरण सांडव्याचे वक्राकार 8 दरवाजे बंद करावेत, अशी मागणी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी औरंगाबाद विभाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांकडे निवेदनाद्वारे केली.
काळे म्हणाले, सन 1918 मध्ये दारणा धरण, नांदुरमधमेश्वर बंधारा व गोदावरी उजवा- डावा कालवा प्रकल्प तयार होऊन नाशिक पाटबंधारे विभागाची स्थापना झाली. अ. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यातील हा प्रदेश पर्जन्य छायेखाली असतो. गेली अनेक वर्षांचा इतिहास आहे कि, सरासरी पावसाळा या तालुक्यांचा 17 इंचापेक्षा जास्त नाही. तत्कालीन शासनाने या भागासाठी नाशिक पाटबंधारे विभाग स्थापन केला. त्यांनी गोदावरी डावा व उजवा कालवा चालवण्यासाठी नांदुरमधमेश्वर उन्नेयी बंधारा बांधला.
नांदूरमधमेश्वर उन्नेयी बंधार्यात गाळ झाला म्हणून सन 2010 मध्ये या बंधार्याची 100 वर्षे जुनी भिंत तोडून तेथे 15 मीटर बाय 8 मीटरचे 8 वक्राकार दारे (Verticle lift gate) बसवले. गाळ वाहून जाऊन नांदूरमधमेश्वर बंधार्याची साठवण क्षमता मुळ पदावर यावी, हे यामागे उद्दीष्ट होते. धरणात साठलेल्या गाळामुळे पाणी साठवण क्षमता 22.64 दलघ मीटर कमी झाली.
दरम्यान, सन 2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडी धरण भरल्याशिवाय गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडता येत नाही. चारही तालुक्यात खरीप हंगामात पाऊस न पडल्यामुळे आवर्तनाची गरज असते. यंदा जायकवाडी धरण लवकर भरले. दारणा धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस चांगला आहे. नाशिक पाटबंधारे विभागाला आग्रह धरला की, गोदावरी उजवा व डावा कालवा प्रवाही करावे. गोदावरीमध्ये नांदूरमधमेश्वरच्या 8 गेटमधून 50 हजार क्युसेकने पाणी जायकवाडीकडे जात होते.
दोन्ही कालव्यांचे दरवाजे सताड उघडे होते, पण कालव्यात पाणी येत नव्हते. हे स्वतः बघीतले. गेल्या 12 वर्षात एकाही अधिकारी व लोकप्रतिनिधीने या बाबीची नोंद घेेतली नाही, ही खेदाची बाब आहे, असल्याचे काळे म्हणाले. ओगीचा तलांक 525.62 मीटर आहे. म्हणजे 8 वक्राकार दरवाजांचा तलांक 525.62 मीटर आहे. या 8 दरवाज्यांची रुंदी 15 मी. बाय 9 मीटर आहे. 1104 मीटर रूंद बंधार्याच्या भिंतीला आपले विभागाने 120 मीटर बाय 9 मीटर असे भगदाड पाडले आहे.
गोदावरी डावा व उजव्या कालव्यांचा तलांक 530.20 मीटरला आहे. त्यांची उंची 533 मीटर आहे. नांदूरमधमेश्वर धरणाची भिंत 533 मीटर उंच आहे. म्हणजे गोदावरी कालवे पूर्ण क्षमतेने वाहावे, असे शासनाला वाटत असेल तर नांदूरमधमेश्वर बंधारा 533.52 मीटरला पूर्ण भरणे आवश्यक आहे, परंतु 8 वक्राकार दरवाजे 120 मीटर बाय 9 मीटर पूर्ण उघडल्यानंतर सुमारे 80 क्युसेक पाणी खाली गोदावरी नदी पात्रात पडताना, कालव्यांचे दरवाजे सताड उघडे असताना, कालवे मात्र कोरडेच असतात. याचाच अर्थ स्पष्ट होतो की, सन 1918 मध्ये ब्रिटीशांनी बांधलेला दारणा प्रकल्पाचा मुळ उद्देश आपल्या विभागाचे अर्धवट ज्ञानाच्या अभियंत्यांमुळे उध्वस्त झाला आहे.
हेही वाचा :
Nitin Chandrakant Desai : बॉलीवूडला कलेचा नवा दृष्टीकोन देणारे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई