जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड येथे व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित पुनर्गठन बैठकीत स्वदेशी वस्तूंच्या समर्थनाचा आणि विदेशी वस्तूंवरील बहिष्काराचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. संघटन अधिक मजबूत करत स्थानिक व्यापाराला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने पार पडलेल्या या बैठकीने संपूर्ण व्यापारी वर्गात नवे बळ निर्माण केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमलजी बंब, महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका जोशी, मकरंद शहापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यापारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने परिसर व्यापाऱ्यांच्या उत्साहाने दणाणून गेला होता. बैठकीदरम्यान व्यापारी महासंघाच्या नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
अध्यक्षपदी तुळजीराम वैद्य, उपाध्यक्षपदी दिनेश चव्हाण, सचिवपदी गोरख जाधव, कार्याध्यक्षपदी किशोर हिवाळे व असिर मोमीन यांची निवड करण्यात आली. टाळ्यांच्या कडकडाटात नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत व्यापारी हितासाठी एकदिलाने काम करण्याचा संकल्प करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष हस्तीमली बंब म्हणाले की, “स्वदेशी वस्तूंचा वापर ही केवळ व्यापाराची बाब नसून ती राष्ट्रसेवेची चळवळ आहे. विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून स्थानिक उद्योग व लघुउद्योजकांना ताकद देणे ही गरज आहे.” संघटित व्यापारी शक्तीमुळे शासनाकडून न्याय मिळवता येतो, असेही त्यांनी अधोरेखित केले.
महिला जिल्हाध्यक्ष प्रियंका जोशी यांनी महिलांसाठी असलेल्या शासकीय योजना, बचतगट, गृहोद्योग व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत सविस्तर माहिती देत महिलांनी उद्योग-व्यवसायात पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
या बैठकीस उपसरपंच अमोल डोईफोडे , जाकेर सय्यद, दीपक पांढरे, मधुकर डांगरे, नारायण सांगुळे, कैलास साहुजी, विलास जाधव, भाऊसाहेब भोजने, अमोल पालकर, रामचंद्र भोजने, प्रफुल्ल साहुजी, संदीप धुळे, विशाल भोजने, रामेश्वर भोजने, मुर्तुजा मोमीन आदींसह व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समस्यांबाबत चर्चा
बैठकीत जामखेड येथील व्यापाऱ्यांच्या विविध समस्या एकत्रितपणे सोडवण्यासाठी व्यापारी महासंघाच्या माध्यमातून ठोस पावले उचलण्याचा निर्धार करण्यात आला. संघटित, सक्षम व स्वदेशी विचारधारेवर आधारित व्यापारी चळवळीने जामखेडच्या व्यापाराला नवी दिशा देण्याची ग्वाही या बैठकीतून देण्यात आली.