अहमदनगर

जामखेड : तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; कमी दाबामुळे रोहित्रांबरोबरच कृषिपंपही खाक

अमृता चौगुले

जामखेड : पुढारी वृतसेवा

कडक उन्हाळ्यात विहिरींना मुबलक पाणी आहे. मात्र, विजेअभावी जवळा, पिंपरखेड, आगी, चौंडी, रत्नापूर आदी सीना भागात उन्हाळी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्र, वीजपंप जळू लागल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जलसंधारण कामांमुळे उन्हाळ्यातही मुबलक पाणीसाठा असल्यामुळे शेतात ऊस, भुईमूग, मुगासह मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन शेतकरी घेत आहेत.

त्यामुळे भर उन्हाळ्यात पिकांना पाणी देणे सुरू असते. परंतु गेल्या काही दिवसांपासून विजेच्या ये-जा व कमी दाबामुळे वीज येत असल्याने पिकांचे व रोहित्र व शेतीपंप जळण्याचे प्रमाण वाढले आहे, याकडे महावितरण अधिकार्‍यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. अनियमित वीजपुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीपिके पाण्याविना होरपळू लागली आहेत. तर , रात्रीच्या वेळीदेखील वीज गायब होत आहे.

त्यामुळे महावितरणच्या धोरणाबाबत शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गतवर्षी परतीचा पाऊस व अवकाळी पाऊस जोरदार पडला. त्यामुळे जलसाठा मोठ्याप्रमाणात झाल्याने शेतकर्‍यांच्या विहिरी व कूपनलिका ऐन उन्हाळ्यात पाणीपातळी चांगली आहे. तालुक्यातील तलावांत अजून मोठा जलसाठा उपलब्ध असल्याने तलाव भागात ऊस शेती फुलली आहे. मात्र याच ऊस शेतीला पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत.

ऐन उन्हाळ्यात महावितरणकडून पूर्ण दाबाने वीज उपलब्ध होत नसल्याने याचा फटका शेती पिकांना बसत आहे. ऊस शेतीबरोबर चारा पिके, पालेभाज्या आदींनादेखील फटका बसत आहे. त्यामुळे हजारो रुपये खर्च करूनदेखील वेळेत पिकांना पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. ज्या वेळेत कृषिपंपासाठी वीज सोडली जाते, त्याही वेळेत तासातासाला वीज ये- जा करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. शेतकरी वीज आली की लगेच कृषिपंप चालू करतात.

त्यामुळे एकाचवेळी कृषिपंप चालू होत असल्याने रोहित्रावर ताण येत आहे. यामुळे बर्‍याचवेळा रोहित्रात बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या घटना घडत आहेत. याचा आर्थिक फटकादेखील शेतकर्‍यांना बसत आहे. भारनियमनामुळे जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील निर्माण होत आहे. त्यामुळे इतर कामधंदे सोडून शेतकर्‍यांना विजेची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे महावितरणने हा प्रश्न सोडविवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

लिंक लाईनचा होणार फायदा

आमदार रोहित पवार यांनी जवळा येथील 33 केव्ही उपकेंद्रांतर्गत लिंक लाईनचे हळगाव भागात काम पूर्ण झाले आहे. जवळा व नान्नज भागातील लिंक लाईन चे काम सुरू असल्याने शेतकर्‍यांना अजून पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे लिंक लाईनच काम पूर्ण झाल्यास याचा फायदा शेतकर्‍यांना होणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. तसेच ही लिंक लाईन 7 किलोमीटरची असून, त्यातील 5 किमीचे काम पूर्ण झाले, तर 2 किमीचे काम आजून अपूर्ण आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT