अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे, खाजगी व्यवस्थापनाकडून 5 हजार 240 शाळा चालविल्या जातात. या शाळांतून सुमारे 9 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार प्रधान जिल्हा न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येऊन शाळांची तपासणी करण्यात येत आहे.
उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये सर्व शाळांची तपासणी करुन वस्तुनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा न्यायाधीश-1 सुनिल गोसावी यांनी सांगितले.
समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश- 1 सुनिल गोसावी, उपजिल्हाधिकारी वैशाली आव्हाड, कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, पोलिस उपअधिक्षक, अनिल कातकडे, तर सदस्य सचिव म्हणून शिक्षणाधिकारी माध्यमिक अशोक कडूस यांचा समावेश आहे.
या तपासणीमध्ये प्रामुख्याने वर्गखोल्यांची स्थिती, शालेय परिसर स्वच्छता, मुला- मुलींचे स्वच्छतागृहे व त्यांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त शाळेला होणारा उपद्रवी घटकांचा त्रास, शाळा परिसरातील अवैध व्यवसाय, तंबाखूमुक्त शाळा, शालेय इमारती व परिसराचा फक्त शैक्षणिक प्रयोजनासाठी उपयोग होतो किंवा नाही यासह इतर अनुषंगिक बाबी तपासल्या जात आहेत.
जिल्हास्तरीय समितीने अहमदनगर तालुक्यातील अकोळनेर, मेहेत्रे वसती, सारोळा कासार व घोसपुरी येथील शाळांची काल तपासणी केली.
हेही वाचा