अहमदनगर

ईअर टॅगिंगची शनिवारपासून अंमलबजावणी; पशुसंवर्धन विभागाचा निर्णय

Sanket Limkar

[author title="शशिकांत पवार" image="http://"][/author]

नगर तालुका : जनावरांना ईअर टॅगिंग बंधनकारक करण्याचा पशुसंवर्धन विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी शनिवार (दि. 1)पासून सुरू होणार आहे. ईअर टॅगिंग, तसेच भारत पशुधन प्रणालीवर नोंद या गोष्टींमुळे जनावरांची खरेदी-विक्री, तसेच सर्वच प्रकरणातील शासकीय मदत, वाहतूक, बैलगाडा शर्यतीतील बैलांचा सहभाग यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तालुक्यात पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांना ईअर टॅगिंग करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

टॅगिंग बंधनकारक

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ईअर टॅगिंग असल्याशिवाय एक जून 2024नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नाही. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला आहे. दि. 31 मार्चपर्यंत टॅगिंग बंधनकारक करण्यात आले होते. त्याची मुदत वाढवून दि. 31 मेपर्यंत करण्यात आली. विशेष म्हणजे टॅगिंग असल्याशिवाय सरकारच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून मिळणार्‍या सेवाही बंद केल्या जाणार आहेत.

पशुधनातील संसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता, तसेच प्राण्यांमधील संक्रमक व संसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

'टॅगिंग'शिवाय सहभाग नाही

ईअर टॅगिंगच्या निर्णयामुळे जनावरांची जन्म-मृत्यूची नोंदणी, प्रतिबंधात्मक औषधोपचार, लसीकरण, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क, खरेदी-विक्रीची माहिती उपलब्ध होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या जनावरांची ईअर टॅगिंगशिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार व जनावरांच्या मालकांवर कारवाई होणार आहे. जनावरांची विक्री करता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे टॅगिंग असल्याची खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी आरोग्य प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत. तसेच बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना टॅगिंग असल्याशिवाय सहभाग घेता येणार नाही. जनावरांच्या टॅगिंगशिवाय कोणत्याही प्रकारचे दाखले संबंधित शेतकर्‍याला मिळणार नाहीत.

भविष्यामध्ये येणार्‍या पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीही नोंदणी आवश्यक आहे. त्याशिवाय उपचार केले जाणार नसल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी जनावरांची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय भविष्यात पशुधन योजनांचा लाभ मिळणार नाही. तालुक्यात तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. निर्मला धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी ईअर टॅगिंग करण्याचे काम करत आहेत. सर्व शेतकर्‍यांनी जनावरांचे ईअर टॅगिंग करून घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

भारत पशुधन प्रणालीवर शेतकर्‍यांनी जनावरांची नोंद आणि ईअर टॅगिंग करणे आवश्यक आहे. जनावरांचा ईअर टॅग काढू नये अथवा तोडू नये. जनावरांचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नव्याने खरेदी केली असेल, तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंदणी करून घ्यावी. पशुधनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

– डॉ. निर्मला धनावडे-गुंजाळ, तालुका पशुसंवर्धन अधिकारी

 

नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, तसेच वन्य पशूंच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची ईअर टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही.

– डॉ. अनिल कराळे, पशुधन विकास अधिकारी

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT