पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने आज (दि.३१) अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी मंगळवारी न्यायालयाने त्यांची कोठडी 31 मे पर्यंत वाढवली होती. चालकाला कोंडून ठेवल्याप्रकरणी दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. दोघांचा जीव घेणाऱ्या अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी त्याला रोख रक्कम आणि भेटवस्तू देण्याचे आमिष दाखविले होते.
चालकाच्या तक्रारीनंतर, येरवडा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा या दोघांविरुद्ध आयपीसी कलम ३६५ आणि ३६८ नुसार नवीन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हरला आरोपी अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी 19 मे ते 20 मे या कालावधीत त्यांच्या बंगल्यात चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवले होते. त्याचा फोनही काढून घेतला होता. नंतर त्याची पत्नीने सुटका केली. विशाल अग्रवाल याला 21 मे रोजी औरंगाबाद येथून तर आजोबांना 25 मेरोजी अटक केली होती.
दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी बाल न्याय मंडळाला पत्र लिहून अपघातप्रकरणी अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मेरोजी शहरातील कल्याणीनगर भागात एका मोटारसायकलला धडक दिल्याने आयटी इंजिनिअर तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता. अल्पवयीन तरुण अपघातग्रस्त आलिशान कार चालवत होता. आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.
बाल न्याय मंडळाने अपघातानंतर काही तासांतच अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून त्याला जामीन मंजूर केल्यावर सर्वांना धक्का बसला होता. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या जनक्षोभ आणि पुनर्विलोकन अर्जानंतर अखेर अल्पवयीन मुलाला ५ जूनपर्यंत निरीक्षण गृहात पाठवण्यात आले होते.
दरम्यान, पोलिसांनी अतुलसह डॉ. श्रीहरी हरनोर आणि डॉ. अजय तावरे या दोन डॉक्टरांनाही अटक केली होती. ससून रुग्णालयातील कर्मचारी घाटकांबळे याने एका महिलेसोबत आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केली होती.
हेही वाचा