अहमदनगर

जामखेड मार्गावर अवैध व्यवसाय तेजीत!

अमृता चौगुले

चिचोंडी पाटील(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर-जामखेड मार्गावरील अनेक गावांमध्ये, तसेच हॉटेलमध्ये अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत. नगर तालुका पोलिसांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या व्यवसायांवर कारवाई होणर का, असा प्रश्न विचारला जात आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सानप यांनी अनेक अवैध व्यवसायांना चाप बसविला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर या अवैध व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

पोलिसांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. नगर-जामखेड मार्ग हा दुसर्‍या जिल्ह्याला जोडला जात असल्याने, या मार्गावर अनेक गुन्हे घडत आहेत. मात्र, याबाबत कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांचा धाक राहिला की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे नगर-जामखेड महामार्गावर दशमी गव्हाण, सांडवे, उक्कडगाव या गावांमध्ये काही दिवसांपूर्वी चोरांनी धुमाकूळ घातला होता. हे चोरटे दिवसाही घरफोड्या करताना दिसून आले. मात्र, नगर तालुका पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

चिचोंडी पाटील बीटमध्ये दोन वर्षांपूर्वी तीन ते चार पोलिस कर्मचारी नेमले होते. मात्र, आता पाच ते सहा कर्मचारी असूनही, या हद्दीमध्ये अवैध व्यवसाय, चोर्‍या असे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे

पोलिस चौकीच्या मागणीकडे दुर्लक्ष

चिचोंडी पाटील येथे जुनी पोलिस चौकी आहे. ती चालू करण्यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मागणी केली. परंतु, ती पोलिस चौकी अद्यापही चालू झालेली नाही. ही चौकी चालू झाल्यास अवैध व्यवसायांना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT