राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी फॅक्टरी परिसरात नगर- मनमाड महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने कार व मालट्रकची समोरासमोर भीषण टक्कर होऊन पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. ११) सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
दीपक गोविंद म्हसे व माया म्हसे (रा. ममदापूर, ता. राहाता) हे पती-पत्नी कारमधून (एमएच १४ एव्ही ३३७२) अहिल्यानगरला दशक्रिया विधीसाठी जात होते. राहुरी फॅक्टरी परिसरात शिर्डीकडे येणाऱ्या मालट्रकची (केए ०१ एएन ५७९७) त्यांच्याशी समोरून जोराची टक्कर झाली. यात दीपक व माया म्हसे जागीच ठार झाले.
एकेरी वाहतुकीचे आणखी किती बळी? नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. यात ठिकठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. या दाम्पत्याचा बळीदेखील एकेरी वाहतुकीमुळे गेल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.