गडचिरोली : वाकडी फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात ट्रकने मोटारसायकला धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली तर तिचा पती किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.11) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झाला आहे. या अपघातात कुंदाबाई जनार्धन आखाडे (वय.७० रा. कुनघाडा रै, ता. चामोर्शी) असे मृत महिलेचे नाव आहे. जनार्दन आखाडे (वय. ७३) हे किरकोळ जखमी आहेत.
कुंदाबाई व जनार्दन हे पती-पत्नी काही कामानिमित्त कुनघाडा येथून त्यांच्या दुचाकीवरुन गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान, वाकडी फाट्याजवळ मोटारसायकल स्लीप झाली यात कुंदाबाई या रस्त्यावर पडल्या. मागून लोहखनिज भरलेला (एमएच ४० सीटी ७८५७) क्रमांकाचा ट्रक येत होता. यावेळी तो ट्रक कुंदाबाई यांच्या अंगावरुन गेला त्यात त्या जागीच ठार झाल्या. जनार्दन आखाडे यांच्या हातापायाला आणि डोक्याला किरकोळ मार लागला आहे. ते दवाखान्यात उपचार घेत आहेत.
अपघाताबद्दल माहिती होताच कुनघाडा गावात शोककळा पसरली. अपघात घडताच ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. गडचिरोली पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.