अहमदनगर

राहुरी : महसूल हे भाजपचे अधिकृत कार्यालय झाले का? आ. तनपुरे

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : चार महिने उलटूनही राहुरी महसूल विभागाने संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेतली नाही. शेकडो निराधारांना शासकीय लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय विभाग हे भाजपच्या नेत्यांच्या इशार्‍यावर चालत असल्याने असे प्रकार घडत आहे. आमदार तनपुरे यांनी महसूल प्रशासनाची झाडाझडती घेतली. तहसीलदार चंद्रसिंह रजपूत यांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला. त्यांच्या निलंबनाची मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व प्रांताधिकारी किरण सावंत यांच्याकडे केली. निलंबन न झाल्यास संजय गांधी निराधार योजनेपासून वंचितांना सोबत घेऊन सोमवारी (दि.26 जून रोजी) धरणे आंदोलन हाती घेण्याचा इशारा आमदार तनपुरे यांनी दिला.

राहुरी महसूल विभागामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नसलेल्या लाभार्थी व कार्यकर्त्यांसह आमदार तनपुरे यांनी अचानक भेट दिली. महसूल प्रशासनाच्या कामकाजाची चांगलीच झाडाझडती घेत आमदार तनपुरे यांनी कामे होत नसल्याबाबत विचारणा केली. आमदार तनपुरे यांनी प्रांताधिकारी सावंत, नायब तहसीलदार संध्या दळवी व पुनम दंडिले यांच्याशी महसूल प्रशासनाच्या खोळंबलेल्या कामकाजाबाबत विचारणा केली. सर्वसामान्यांची कामे होत नसताना तहसीलदार चंद्रसिंह रजपूत हे कार्यालयात उपस्थित नसल्याने आमदार तनपुरे चांगलेच संतापले. तहसीलदार रजपूत यांच्याशी संपर्क साधला असता फोन लागत नसल्याचे सांगण्यात आले.

मागिल चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची बैठक न घेतल्याने शेकडो गरजूवंत महसूल प्रशासनाच्या खेट्या मारत आहे. आमदार तनपुरे यांनी सांगितले की, अनेक जण माझ्याकडे बैठकीबाबत विचारणा करीत आहे. परंतु महसूल विभाग हे भाजपचे अधिकृत कार्यालय झाले की काय? अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. रेशन कार्ड, वाळू तस्करीच्या समस्या असताना तहसीलदार रजपूत हे गांभीर्य घेत नाहीत. महसूल प्रशासनाच्या आवारामध्ये काही अवैध सेतू कार्यान्वित झाले आहेत.

संबंधित कार्यालय हे भाजपचे कार्यकर्ते चालवित असल्याने कोणतीही कारवाई होत नाही. भाजपच्या नेत्यांच्या आदेशाप्रमाणे महसूलचे कामकाज सुरू असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहे. नागरीकांना कामकाजासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर अन्याय सहन करणार नाही. याप्रसंगी प्रांताधिकारी सावंत यांनी आमदार तनपुरेंशी संवाद साधत सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

लवकरच संजय गांधी निराधार योजनेची बैठक घेऊ. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावू, असे प्रांताधिकारी सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी सुर्यकांत भुजाडी, बाळासाहेब उंडे, प्रकाश भुजाडी, शहाजी जाधव ठाकूर, पंचायत समितीचे माजी सभापती रविंद्र आढाव, ज्ञानेश्वर जगधने, किशोर पातोरे, महेश उदावंत, रावसाहेब पवार, निलेश जगधने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्याशी आ. तनपुरेंची चर्चा

आमदार तनपुरे हे संतापलेले असताना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दुरध्वनीवरून चर्चा साधत तहसीलदार रजपूत यांना कारणे दाखवा नोटिस बजावत कामकाजात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. परंतु आमदार तनपुरे यांनी तहसीलदार रजपूत यांना निलंबित करा, अशी मागणी लावून धरत सर्वसामान्यांना न्याय देण्याची मागणी केली. निलंबन न झाल्यास सोमवारी (दि.26) रोजी धरणे आंदोलन करणार असून महसूलच्या कामकाजाचा मुद्दा विधानभवनात उपस्थित करू, असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT