अहमदनगर

घोडेगाव पाणी योजनेला ‘महसूल’चा खोडा

अमृता चौगुले

सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रगतिपथावर असलेल्या घोडेगाव पाणी योजनेच्या ठेकेदारास दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावून राजकीय दबावातून महसूल प्रशासन, तसेच मुळा पाटबंधारे प्रशासनाकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या विरोधात घोडेगाव चौफुलीवर आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तेथील ग्रामस्थांनी दिला आहे. घोडेगाव परिसराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी जलजीवन योजनेतून भरभक्कम निधी उपलब्ध होऊन साठवण तलावाचे काम सुरू आहे.

मुळा पाटबंधारे विभागाच्या संपादित जागेत हे काम नियमानुसार व प्रगतिपथावर असताना राजकीय सूडबुद्धीतून महसूल तसेच पाटबंधारे प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. या धादांत खोट्या तक्रारींची नेवासा तहसीलदारांनीही राजकीय दबावाखाली तातडीने दखल घेऊन मुरुमाचे बेकायदा उत्खनन, तसेच विल्हेवाट लावल्याचा ठपका ठेवत तब्बल दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

एकीकडे पाणी योजनांचे काम वेळेत करण्याचे सरकारचे धोरण असताना दुसरीकडे शासकीय अधिकारीच या योजनांच्या कामांना खोडा घालत असल्याच्या विरोधाभासाकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले आहे. सदरचे काम नियमानुसार सुरू असल्याचे ग्रामस्थांचे ठाम मत असून प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. जलसंपदा विभागाच्या जुन्या जीर्ण अवस्थेतील इमारती तसेच पाणीवापर संस्थांची कार्यालये पाडण्यासाठी पाटबंधारे प्रशासनाकडून मंजुरी मिळाली नसल्याची बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली आहे.

तालुक्यात पाणी योजनेसारख्या सामान्य लोकांशी निगडित अत्यावश्यक विकासकामांत खोडा घालण्यापर्यंत विरोधकांची मजल गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. केवळ राजकीय द्वेषातून चांगल्या लोकोपयोगी उपक्रमांना लक्ष्य करण्याचे सत्र तालुक्यात सुरू झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील राजकीय सत्ता संघर्षाची झळ थेट सर्वसामान्य लोकांना बसू लागल्याची खंत व्यक्त केली जाऊ लागली आहे.

विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून आमदार गडाख यांना राजकीय लक्ष्य करण्याच्या नादात सामान्य जनतेचे नुकसान करत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. पाणी योजनेच्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून कामाला खोडा घालण्यात येत असल्याने घोडेगाव ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी लक्ष वेधल्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी संबंधितांना खडसावून जाब विचारला आहे. मात्र राजकीय दबावातून करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यास संबंधित अधिकारी असमर्थ बनल्याचे दिसून आल्याने याविरोधात त्यांनी येत्या दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव चौफुलीवर ग्रामस्थांसह रास्ता रोको व गाव बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT