अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत घोषणा केल्याप्रमाणे आता जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांतही सर्व रुग्णांवर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर गुरुवारी पहिल्याच दिवशी जिल्हा रुग्णालयात 600 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले.
रुग्णांसाठी आता केसपेपरचे शुल्कही रद्द करण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या 3 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत शासकीय रुग्णालयांतील सर्व तपासण्या व उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची घोषणा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात करण्यात आली. त्यानुसार आता सर्वच शासकीय रुग्णालयांत विविध उपचारांबरोबरच केसपेपरचे शुल्कही घेतले जाणार नाही. त्यामुळे एक रुपयाही खर्च न करता मोफत उपचार, चाचण्या आणि शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत.
या चाचण्या मोफत : हिमोग्लोबीन, सीबीसी रक्त तपासणी, गरोदर महिला तपासणी, एचआयव्ही, मधुमेह आदी.
जिल्ह्यात 200 खाटांचे एक जिल्हा रुग्णालय आहे. तसेच 3 उपजिल्हा रुग्णालये आणि 19 ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा रुग्णालयात दररोज सरासरी 450-475 रुग्ण येतात. यामध्ये महिलांची संख्या अधिक असते. तेथे केसपेपरच्या माध्यमातून दररोज 4500 रुपये जमा होतात. ग्रामीण रुग्णालयांत बाह्य रुग्ण विभागात सरासरी दररोज 150 रुग्ण येतात.
शासनाच्या या योजनेतून आता रक्ताची पिशवीदेखील मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. पूर्वी रक्ताच्या एका पिशवीसाठी शासनातर्फे 1100 रुपये आकारले जात असत. शिवाय डायलेसिससाठी पूर्वी 50 रुपये शुल्क होते. तेदेखील आता पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत रुग्णसेवा तथा उपचार दिले जात आहेत. पहिल्याच दिवशी 600 रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले. याशिवाय विविध चाचण्याही मोफत केल्या जातील. यातून निश्चितच रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
– डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर
पूर्वी किती होते शुल्क
केसपेपर : 10 रुपये
अॅडमिट ः 400 रुपये
छोटी शस्त्रक्रिया ः 200 रुपये
मोठी शस्त्रक्रिया ः 500 रुपये
डायलेसिस ः 50 रुपये
जेवण ः 20 रुपये
हेही वाचा