अहमदनगर

खासदार, आमदारांना सरकारी रुग्णालयातच उपचार सक्ती करा!

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आमदार, खासदारांसह सरकारी कर्मचारी आणि अधिकार्‍यांना खासगी व्यवस्थेतून उपचार करण्यासाठी दिली जाणारी रक्कम पूर्णपणे बंद करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतच उपचार घेणे सक्तीचे करावे, अशी मागणी सिटीझन फोरम संघटनेच्या वतीने लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, नगरच्या जिल्हा रुग्णालयाकडेही या अर्जाची दखल घेताना येथील आरोग्य सोयीसुविधा, मनुष्यबळ, औषध पुरवठा याबाबत माहिती संकलित केली जात असल्याचे समजले आहे.

नागरिकांना संविधानाने प्राप्त दर्जेदार, गुणवत्तापूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था या मुलभूत अधिकाराचे राज्य सरकारकडून होणार्‍या पायमल्लीविरोधात 'अलर्ट सिटीझन फोरम'च्या वतीने थेट लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मृत्युशय्येवर असल्याचे काही ठिकाणी झालेल्या मृत्युच्या तांडवावरून अधोरेखीत झाले आहे. आरोग्य व्यवस्थेची अशीच दयनिय अवस्था ही ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय, तालुका रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत शासन-प्रशासन, लोकप्रतिनिधी, असंवेदनशील सरकार हे उदासिन असल्याचे दिसते. आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी जागतिक बँकेने दिलेल्या मदतीचा, कर्जाचा विनियोग योग्य रितीने न करता त्याला आर्थिक भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, मनुष्यबळाचा प्रश्न जाणवत असल्याचे म्हटले आहे.

  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर श्वेतपत्रिका काढावी,
  • कर्मचार्‍यांना बायोमेट्रीक हजेरी वेतनाशी जोडावी, जेणेकरून कार्यालयीन वेळेत खासगी क्लिनीक चालविण्याला लगाम बसेल.
  • खरेदी केलेल्या औषधांना फुटणार्‍या वाटा रोखण्यासाठी केंद्राच्या सीजीएसएच व्यवस्थेत ज्या प्रकारे औषधांचे वितरण ऑनलाईन पद्धतीने केले जाते, रुग्णांना कोणती औषधे दिली, किती दिली, याचा संदेश जातो. त्याच पद्धतीचा वापर औषध वितरणासाठी व्हावा.
  •  आमदार आणि खासदार निधीतून कार्यकर्त्यांना पोसणारी कामे बंद करून त्या निधीचा वापर आगामी पाच वर्षासाठी कार्यक्षेत्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठीचा कायदा करावा.
  •  आरोग्य व्यवस्थेवर 10 टक्के खर्च केला तरच अन्य विकास कामांसाठी निधी देण्याचा कायदा केला जावा.
  •  सरकारी आरोग्य व्यवस्थेवरील निधीची नागरिकांना माहिती मिळेल, यासाठी सरकारी संकेतस्थळ तयार करावे. प्रशासन आणि राजकीय नेत्यांना चटके बसले की आरोग्य व्यवस्था निश्चितच सक्षम होईल, असे मत या पत्रात सुधीर दाणी यांनी नमूद केले आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आपण अलर्ट सिटीझन फोरमच्या माध्यमातून लोकायुक्तांकडे अर्ज केलेला आहे. यावर निश्चितच लवकरच सुनावणी होऊन या व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– सुधीर दाणी, अलर्ट सिटीझन फोरम

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT