अहमदनगर

आर्द्रा सरींवर पेरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग

अमृता चौगुले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिली; मात्र आर्द्रा नक्षत्रात तालुक्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पाऊस पेरणी योग्य नसला तरी पाऊस होईल, या अपेक्षेवर शेतकर्‍यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे चित्र आहे. थोड्याफार प्रमाणात मुगाची पेरणी करण्यात आली असून बाजरी, सोयाबीनची पेरणी करण्यात शेतकरी व्यस्त झाला आहे. नुकतेच पुनर्वसू (6 जुलै) नक्षत्र लागले असून, या नक्षत्रात पाऊस झाला तर पेरणी केलेल्या पिकांना निश्चित फायदा होणार आहे. परंतु पुनर्वसूत पावसाने पाठ फिरवल्यास शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढाऊ शकते. तालुक्यात लाल कांद्याची पेरणी देखील करण्यात येत असते मात्र पावसाअभावी लाल कांद्याची पेरणी झालीच नाही.

तालुक्यातील 11 महसूल मंडळात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. तरीही शेतकरी पेरणी उरकून घेत आहे. सद्यस्थिती तालुक्यात 30 ते 35 टक्के पेरण्या झाल्या आहेत. मुगाच्या क्षेत्रात साधारणपणे 60 टक्क्यांपर्यंत घट येणार आहे. या क्षेत्राावर बाजरी, सोयाबीनच्या पिकांची वाढ झालेली आहे.

तालुक्यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी ही पाच पिके मुख्य खरीप पिके म्हणून ओळखली जातात. दुय्यम पिके म्हणून मका, वटाणा, घेवडा काही प्रमाणात कपाशी पीक घेतले जाते. खरीप कांद्याची पेर झालीच नाही तर खरीपाच्या ज्वारीचे उत्पादन तालुक्यात घेतले जात नाही. मुगाचे क्षेत्र घटल्यानंतर बाजरी, सोयाबीनची पेर वाढली त्याचबरोबर काही भागात वटाणा व श्रावणी घेवड्याचे क्षेत्र ही वाढल्याचे दिसून येते.

सर्व शेतकर्‍यांनी एक रुपया विमा भरून स्वयंघोषित पेरणी पत्र द्यावे. 99 रुपये शेतकर्‍यांचे सरकार भरणार आहे. पिकविम्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख आहे. तरी, प्रत्येक शेतकर्‍यांनी तत्काळ संरक्षित पीक विमा भरून घ्यावा.
                                        -सिद्धार्थ क्षीरसागर, तालुका कृषी अधिकारी, नगर

मंडळनिहाय पाऊस (मि.मी.)
नालेगाव 89.3, सावेडी 59.3, कापूरवाडी 106.1, केडगाव 76.4, भिंगार 102.1, नागापूर 65.1, जेऊर 46.9, चिचोंडी पाटील 96, वाळकी 50.8, चास 74.2, रुईछत्तीसी 146.3.
(तालुक्यात सरासरी
पाऊस 82.8 मि.मि.)

खरीप पिकांच्या पेरण्यांचे नियोजन
बाजरी- 10711, मका – 2671, तूर- 5122, मूग- 15051, उडिद -1910, सोयाबीन – 14500, कापूस – 1510, कांदा – 8412,
एकूण क्षेत्र 61 हजार हेक्टर

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT