file photo 
अहमदनगर

चक्क एटीएममधून निघाल्या बनावट नोटा ! ग्राहकांमध्ये उडाली मोठी खळबळ

अमृता चौगुले

 नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा शहरातील एका एटीएममधूनच बनावट नोटा निघाल्याने ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एटीएममधून निघणार्‍या नोटा कोर्‍या करकरीत आणि तंतोतंत मोजलेल्या असतात, असा प्रत्येकाचा पक्का विश्वास असतो. प्रवासात सुरक्षिततेचा उपाय म्हणून एटीएमद्वारे पैसे काढणार्‍यांची संख्या मोठी आहे. परंतु, या प्रकरणामुळे या विश्वासाला धक्का पोहोचला आहे.
शहरात आषाढी एकादशीमुळे गुरूवारी (दि 29) गर्दी होती. सकाळी टिळापूर (ता. राहुरी) येथील अभय सुदाम मुंडे हा तरूण आपल्या घरच्यांना सोबत घेऊन कामानिमित्त नेवासा येथे आला होता. येथील बसस्थानक परिसरातील एका एटीएममधून काढलेल्या नोटांमध्ये चक्क पाचशे रूपयांच्या दोन नोटा नकली निघाल्या आहेत.

मुंडे हा गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर गेला असता, पंपचालकाने सदरच्या नोटा बनावट असल्याचे सांगितले. त्याने तत्काळ तेथील तक्रार निवारण नंबरवर संपर्क केला. तसेच जवळ असलेल्या नागरीकांना ही बाब सांगितली. अनेकांचा विश्वास बसत नसल्याने एटीएममध्ये लावलेल्या कॅमेर्‍यात चौकशी करण्याचा आग्रह केला. तक्रार निवारण नंबरवर फोन केला असता मुंडे यांना कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलून घ्या, असे सांगण्यात आले.

गुरूवारी आषाढी एकादशी व बकरी ईद असल्याने सर्व बँका बंद होत्या व ज्या बँकेचे एटीएम आहे, त्या बँकेची शाखा नेवासा शहरात नाही. त्यामुळे मुंडे यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. मुंडे एटीएममधून पैसे काढण्यास गेले. त्यांनी 3 हजार रूपये काढले. यात पाचशे रूपयाच्या दोन नकली नोटा आढळल्या. हे लक्षात येताच त्यांनी बँकेकडे संपर्क केला असता, एकादशीनिमित्त सुट्टी असल्याने संपर्क होऊ शकला नाही. अशा नकली नोटा जर बँक किंवा एटीएममधून ग्राहकांपर्यंत पोहचू लागल्या, तर यापुढे जबाबदारी कुणाची, असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT