अहमदनगर

साकूर पठार भागात पेटले पिण्याचे पाणी : ग्रामस्थांचे सहा दिवसांपासून आमरण उपोषण

Laxman Dhenge

घारगाव  : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागात पाणी टंचाईचे भीषण संकट ओढावल्याने पाणी प्रश्न पेटला आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याची तीव्र दाहकता पाहता पिंपळगाव खांड धरणातून पिण्याचे आवर्तन सोडावे, या मागणीसाठी 1 मार्चपासून जांबुतगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. तब्बल सहाव्या दिवशी उपोषण सुरु असताना दुसरीकडे 7 मार्च रोजी साकुर ग्रामपंचायत येथे सकाळी 9 वा. एकत्र येवून पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर 19 मैलावर रस्ता रोको करण्याचा इशारा थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर यांनी दिल्याने पिण्याचे पाणी पेटल्याची संतप्त सूर उमटत आहे. सहा दिवसांच्या आमरण उपोषणाला एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांनी भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसह नागरीकांच्या समस्या जाणून घेत थोरात यांनी दखल घेतली.

पिंपळगाव खांड धरणातून पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी प्रशासनाकडे मागणी करीत संगमनेर बाजार समितीचे सभापती व साकुरचे उपसरपंच शंकर पा. खेमनर यांनी केली, परंतु अकोलेचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी विरोध दर्शवत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात उडी घेतल्याने पिंपळगाव खांड धरणाचे पाणी साकुर पठार भागात पेटल्याचे वास्तव दिसत आहे. पाण्यामुळे संगमनेर- अकोले असा नवा वाद उभा राहिला आहे. साकुरकरांच्यावतीने आज 7 मार्च रोजी पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावर 19 मैलावर रस्ता रोको करण्याचा इशारा थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर यांनी दिल्याने पिण्याच्या पाण्याला आग लागली आहे.
दरम्यान, याप्रश्नी बुधवारी 6 रोजी प्रांतधिकारी शैलेश हिंगे यांच्यासमवेत बैठक झाली, परंतु चर्चा निष्फळ ठरल्याने एकिकडे उपसरपंच सुभाष डोंगरे यांचे शांततेच्या मार्गाने उपोषण तर दुसरीकडे रस्ता रोको आंदोलनाने मात्र वातावरण चिघळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

संगमनेर तालुक्यातील साकूर, घारगाव, बोरबन, तांगडी, कोठे बुद्रुक, कोठे खुर्द, नांदूर, खंदरमाळ, बिरेवाडी, मांडवे बु, शिंदोडी, कौठेमलकापूर, शेळकेवाडी, दरेवाडी, रणखांब, खंडेरायवाडी, पिंपळगाव देपा, जांबूत खु, जांबूत बु., हिवरगाव पठार, शेंडेवाडी, तास्करवाडी, चिचेवाडी, हिरेवाडी तर पारनेर तालुक्यातील मांडवे खु., देसवडे, टेकडवाडी, काळेवाडी, पोखरी, खडकवाडी आदी गावे मुळा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ही सर्व गावे मुळा नदीकाठी आहेत. नदीला पाणी असेल तेव्हाच पाण्याची सोय होते, परंतु यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. साकुर पठारातील गावांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने साकुरभाग आक्रमक झाला आहे.

'पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत 1 मार्चपासून जांबूतचे उपसरपंच आमरण उपोषणाला बसले. या उपोषणाची पठार भागातील गावांनी दखल घेत त्यांना पाठिंबा दिला. कृती समिती स्थापन केली. माझी शासनाला विनंती आहे, या आंदोलनाची लवकर दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. गुरूवारी दि. 7 मार्च रोजी साकुर ग्रामपंचायत समोर सकाळी 9 वा. पठार भागातील नागरिकांनी उपस्थित रहावे. येथून सर्वजण पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर 19 मैल येथे रस्तारोको करणार आहोत. एकूण 13 केटीवेअर आहेत. शिंदोडीपर्यंत पाणी सोडा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

– इंद्रजित खेमनर, थोरात साखर कारखाना संचालक.

पाण्यावर पहिला हक्क अकोलेचा : आ. डॉ. लहामटे

अकोले तालुक्यात पाऊस पडतो. धरणं भारतात. आदिवासी जनतेला हक्क मिळत नाही. त्यांना त्यांचा हक्क कधी देणार, कुणीतरी यायचं अन् पाणी सोडून खाली घेऊन जायचं. 2019 साली काय झालं. सगळं पाणी खाली नेलंं. शेतकर्‍यांची पिके जागेवर वाळली. आमच्याकडचं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आमचेच रस्ते खराब झाले. पिकांचे नुकसान झाले. मुळा खोर्‍यात आहे किती पाणी, आधीचे पुढारी म्हणायचे 'मुळा बारमाही केली,' पण, तेथेच पिण्याच्या पाण्याची भ्रांत निर्माण होत आहे. आमच्याच हक्काचं पाणी आम्हाला ठेवायचं नाही. कुणीही यायचं अकोले तालुक्याच्या पाण्यावर हक्क गाजवायचा. यापूर्वी कुणी पाणी विकलं असेल, पण आता यापुढे ते चालणार नाही. पाण्यावर पहिला हक्क आमच्या अकोले तालुक्याचा, नंतर मतदार संघाचा, मग बाकीच्यांचा आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT