पारनेर : पुढारी वृत्तसेवा
पारनेर तालुक्यातील मुंगशी शिवारात हरणाला रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण जखमी झाले होते. याच अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडले होते. सकाळी सहाच्या सुमारास फेरफटका मारायला गेलेल्या तरुणांच्या लक्षात ही घटना आल्यानंतर त्यांनी त्या हरणाला घरी नेत प्रथोमपचार केले. यानंतर त्याला वनविभागाच्या अधिकार्यांकडे दिले.
मुंगशी येथील किशोर सुभाष वाळुंज, विकास दगाबाज सकाळी फिरायला गेले होते. त्यांना म्हसणे – विसापूररस्त्या लगत जखमी अवस्थेत हरणाचे पिल्लू आढळून आले. यानंतर हरणाच्या पिल्लाचे नीट निरीक्षण केले असता त्याला कुठलीही गंभीर जखम न झाल्याचे लक्षात आले. आसपास परिसरात कोठेही हरणांचा कळप दिसत नसल्याने जखमी अवस्थेत त्याला उभा राहता येत नसल्याने त्याला तिथे सोडणे धोकादायक होते. यामुळे त्यांनी हरणाला घरी आणले आणि वनविभागाला याची माहिती दिली.
घरी आणल्यानंतर त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यावेळी शिवाजी बागल, योगिता वाळुंज, श्रावणी वाळुंज यांनी मदत केली. काही वेळानंतर वनविभागाचे संदीप कारले, बी. आर. पाचरणे, एस.आर. गोरे आल्यानंतर किशोर वाळुंज यांनी वनविभाग विभागाच्या कर्मचार्यांकडे पिल्लाला सुपूर्त केले. वन विभागाच्या अधिकार्यांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवत चालता फिरता आल्यानंतर जवळच असणार्या जातेगाव वनविभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले. तरुणांच्या सतर्कतेमुळे जखमी हरीणाचे प्राण वाचले.