अहमदनगर

दु्र्दैवी : गर्भपातानंतर महिलेचा मृत्यू; राजूरच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा

Laxman Dhenge

अकोले : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक अर्हता आणि वैद्यकीय अधिकार नसताना महिलेचा गर्भपात केल्याच्या आणि त्याद्वारे तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून राजूर येथील डॉ. बाबासाहेब तुकाराम गोडगे यांच्या विरोधात राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शेणित येथील सीताबाई संदीप तळपे (वय 24, रा. शेणीत, ता. अकोले) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिस उपनिरीक्षक जैनुद्दिन फजल शेख यांनी यासंदर्भात फिर्याद दिली.

फिर्यादीत नोंदविलेल्या माहितीनुसार सीताबाई तळपे हिचा 11 मार्च 2023 रोजी मृत्यू झाला. त्याबाबत तपास सुरू होता. त्यात प्रवरा ग्रामीण रुग्णालयात (लोणी, ता. राहाता) येथे शवविच्छेदन केले असता, सीताबाईचा गर्भपात झाला असून, त्यात गर्भाचा तुकडा गर्भपिशवीत राहिल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले. याबाबत चौकशीमध्ये सीताबाईचा पती संदीप तुकाराम तळपे याने गर्भपात व नंतरच्या घटनाक्रमाची माहिती पोलिसांना दिली.

त्यावर जिल्हा शल्यचिकित्सकांचा अभिप्राय घेण्यात आला. त्यातही डॉ. गोडगे यांना गर्भपाताचा अधिकार नसल्याचे सांगून त्यांनी सीताबाईवर केलेले औषधोपचार योग्य नव्हते, असा ठपका ठेवत एमटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानुसार डॉ. गोडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT