अहमदनगर

दुर्दैवी ! धरणग्रस्त कुटुंबाने मागितले इच्छामरण

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी (नाथसागर) धरणासाठी सर्वस्व गमावून 50 वर्षे लोटली तरीही पुनर्वसन प्रक्रियेत सामावून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या नैराश्यातून खरवंडी येथील खर्डे कुटुंबाने थेट इच्छामरणाची परवानगी मागितल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खरवंडी (ता.नेवासा) येथील पुनर्वसनापासून वंचित धरणग्रस्त रेवणनाथ नामदेव खर्डे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन राज्य सरकारच्या अनास्थेमुळे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसह पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून पाठपुरावा करुनही कागदी घोडे नाचविण्यापलिकडे ठोस कार्यवाही होत नसल्याने येत्या दि. 21 डिसेंबरपासून खरवंडीच्या खळवाडी परिसरातील मारुती मंदिरात कुटुंबीयांसह उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. राज्य सरकार अजूनही याप्रश्नी सकारात्मक नसल्यास संपूर्ण कुटुंबाला इच्छामरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

खर्डे म्हणाले, सुमारे 50 वर्षांपूर्वी जायकवाडी जलाशयासाठी भूसंपादन करण्यात आले. त्यावेळी या विस्थापितांना त्यांचे सुयोग्य पुनर्वसनासह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना सरकारी सेवेत प्राधान्यक्रमाने सामावून घेण्यात येणार असल्याचे गोंडस आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकीच एक असलेल्या नामदेव तुकाराम खर्डे यांची शेवगाव तालुक्यातील ढोरचांदगांव येथील तब्बल 15 एकर सुपीक शेतजमीन राहत्या घरासह संपादित करण्यात आली. पुनर्वसन प्रक्रियेचा एक भाग म्हणून त्यांना नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे स्थलांतरित करण्यात आले. खर्डे त्यांची आई, पत्नी, पाच मुले, दोन मुलींसह खरवंडीला स्थलांतरित झाले. खर्डे यांनी कुटुंबाच्या उपजिविकेसाठी पुनर्वसन नियमानुसार शेतजमीन मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र, नगर येथील भूसंपादन, तसेच पुनर्वसन अधिकार्‍यांनी अवघी दोन एकर जमीन देऊन बोळवण केल्याचा खर्डे यांचा आरोप आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अहोरात्र काबाडकष्ट करुन तसेच भविष्याच्या चिंतेने नामदेव खर्डे, त्यांच्या पाठोपाठ त्यांची पत्नी, तीन मुले असे एकामागे एक करात पाच सदस्य मरण पावले. तिन्ही मुलांची त्यांच्या पश्चात कुटुंबे उघड्यावर पडली. खर्डे कुटुंबाची ही वाताहत सरकारने केलेल्या फसवणुकीमुळेच झाल्याचा आरोप रेवणनाथ खर्डे यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर खर्डे यांनी त्यांची समक्ष भेट घेऊन गार्‍हाणे मांडले. शिंदे यांनी तातडीने सूत्रे फिरवून प्रशासन कामाला लावल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. मात्र, तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या बदलीनंतर परत हा विषय मागे पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पुनर्वसनासाठी झिजविले उंबरठे
पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगरच्या पुनर्वसन विभागाचे अनेक वर्षे उंबरठे झिजवूनही संबंधितांनी दाद दिली नाही. अधिकारी व कर्मचार्‍यांकडून उडवाउडवीचे उत्तरे देऊन आमची बोळवण करण्यात आली.त्यामुळे आता दाद मागायची कोणाकडे, असा सवाल खर्डे यांनी केला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT