अहमदनगर

कोपरगाव : काकडी ग्रामपंचायतची रक्कम तातडीने देऊ : अजित पवार

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : मौजे काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यापासून आजपर्यंत ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी रक्कम देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे ग्रामपंचायतीची मालमत्ता कराची सुमारे 7 कोटी रुपये थकबाकी असून, ती तातडीने ग्रामपंचायतला देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर सदर थकीत कराची रक्कम त्वरित देण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस व पवार यांनी दिली.

गुरुवारी काकडी येथे शिर्डी विमानतळालगत आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आले असता, माजी आमदार कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काकडी-मल्हारवाडी ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने त्यांना भेटून याबाबत निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात काकडी ग्रामपंचायतच्या सरपंच पूर्वाताई गुंजाळ, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे, कानिफनाथ गुंजाळ, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय डांगे, ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब मोरे, इंद्रभान गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ यांच्यासह ग्रामस्थ तसेच भाजप आणि विविध संस्थांच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांचा समावेश होता.

शिर्डी हे जागतिक ख्यातीचे देवस्थान असून, येथे श्री साईबाबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज असंख्य भाविक येतात. शिर्डीला येणार्‍या साईभक्तांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना या विमानतळाचे काम पूर्ण झाले असून, त्यांच्याच कार्यकाळात 1 ऑक्टोबर 2017 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण झाले होते.

थकीत रक्कम देण्याचे अश्वासन

ग्रामपंचायतची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडे थकीत असलेली कराची सुमारे सात कोटी रुपयांची रक्कम तातडीने देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT