अहमदनगर

राहुरी : पोलिस उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा

अमृता चौगुले

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जमीन खरेदीत फसवणूक झाल्याने मदत मागण्यास गेलेल्या महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सज्जनकुमार नर्‍हेडा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राहुरी तालुका परिसरातील संबंधित महिलेने याबाबत फिर्याद दिली. याबाबत समजलेली माहिती अशी : संबंधित महिलेने देवळालीतील एका व्यक्तीने फसवणूक केल्याची तक्रार देवळाली प्रवरा पोलिस ठाण्यात केली होती. त्या वेळी एका अनोळखी व्यक्तीने पोलिस उपनिरीक्षक नर्‍हेडा यांचा फोन नंबर देत 'ते तुमची तक्रार घेतील' असे सांगितले. महिलेने नर्‍हेडा यांच्याशी संपर्क साधला.

नर्‍हेडा यांनी दोन दिवसांनी महिलेला राहुरी पोलिस ठाण्यात बोलावले. 7 जून रोजी भेट झाल्यानंतर 'मी तुमची मदत करीन, परंतु मला काय मिळेल' असे विचारले. महिलेने 'तुम्हाला 50 हजार देते, परंतु मला न्याय द्या,' असे विनवले. मात्र 'पैशासह अजून काय देणार?' असा प्रश्न नर्‍हेडा यांनी विचारला. 'मला पैशासह अजून काय हवे ते तू समजून घे,' असे म्हणत दबाव आणला. सोशल मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपवर 'तू मला आवडते' असा संदेश पाठविला.

दरम्यान, 8 जुलै रोजी महिलेने पोलिस निरीक्षक नर्‍हेडांच्या कृत्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली. त्यानंतरही नर्‍हेडा यांनी पुन्हा महिलेला व्हॉट्सअ‍ॅप व्हाईस कॉल करीत 'तू जर माझ्याकडे आली नाहीस, तर मी काहीपण कृत्य करीन,' अशी धमकी दिली. 17 जुलै रोजी महिला दुपारच्या वेळी तहसील कार्यालयात गेली, तेव्हा नर्‍हेडा याने महिलेला समवेत रूमवर येण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्यानंतर नर्‍हेडांनी रात्री घरी येऊन 'मुलासमोर कोणतेही कृत्य करीन,' अशी धमकी दिली.

दुपारी चारच्या सुमारास महिला राहुरी स्टेशन रस्त्यावरील नर्‍हेडा याच्या रूमवर गेली, त्या वेळी नर्‍हेडा यांनी अत्याचार केली, अशी तक्रार राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. राहुरी पोलिस ठाणे कायमच वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. पोलिस अधिकारी नर्‍हेडा याची कारकीर्द वादग्रस्त ठरत होती. महिलेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने अनेक प्रकरणांबाबत नर्‍हेडांच्या कृत्यांबाबत कुजबूज सुरू झाली आहे.

आमदार तनपुरे यांची 'लक्षवेधी'

महिलेवर पोलिस अधिकार्‍याने अत्याचार केल्याच्या या गुन्ह्यासंदर्भात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. राहुरी येथे पोलिस अधिकारी महिलेवर अत्याचार करत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे? महिला सुरक्षिततेचे काय? जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले, असे त्यांंनी विधानसभेत सांगितले. त्यावर 'पोलिस अधिकार्‍यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल असेल, तर तत्काळ बडतर्फ करू,' असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा

कोल्हापूर : पंचगंगा पात्राबाहेर; जलपातळी 13 तासांत 6 फुटांनी वाढली

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT