श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : कांदा निर्यात बंदी, दूध हमीभाव मागणीकडे दुर्लक्ष व इथेनॉल उत्पादनावर बंदीचा निर्णय पाहता, केंद्र व राज्य सरकार शेतकर्यांच्या प्रश्नावर अतिशय असंवेदनशील आहे. ते शेतकर्यांच्या जीवनाशी खेळत असल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. सरकारच्या या नाकर्तेपणा विरुद्ध मंगळवारी (दि.12) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
शासन दररोज जाहिरातींवर करोडो रूपयांचा खर्च करीत आहे. परंतु, आज शेतकरी अनेक संकटांनी ग्रासलेला असताना व त्यांना मदतीची आवश्यकता असताना शासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. शेतकर्यांच्या दुधाला हमीभाव मिळावा. कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी. विमा पॉलिसीचा अग्रीम हप्ता सरसकट सर्वांना मिळावा. गारपीटग्रस्त उपाययोजना सर्व मंडळांना लागू कराव्यात. मागील अतिवृष्टीचे थकित अनुदान सर्वांना त्वरित अदा करावे.
ऑनलाईन पीक पाहणीची अट रद्द करावी. कारखान्यांना इथेनॉल उत्पादनावर घातलेली बंदी त्वरित उठवावी, अशा मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी काँग्रेस हल्लाबोल आंदोलन करणार आहे. त्यामध्ये जिल्हा महिला काँग्रेस, युवक काँग्रेस व काँग्रेस अंतर्गत सर्व सेलचे पदाधिकारी व सदस्य आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष नागवडे यांनी केले आहे.
हेही वाचा