श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : दुष्काळी भागातील 182 गावांचा निळवंडेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला, मात्र आता यापुढे घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी लढाई करायची आहे. यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचा ठाम विश्वास खा. सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी, आनंदवाडी परिसरातील तामकडा पाझर तलावाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, संपर्कप्रमुख बाजीराव दराडे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ रहाणे, उपजिल्हा प्रमुख अर्जुन काशीद, रणजीत ढेरंगे, तालुका प्रमुख रमेश काळे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, महिला आघाडी प्रमुख कावेरी नवले, ग्रामपंचायत सदस्य अंकुश राहणे, शाम राहणे, तृप्ती बोर्हाडे, माजी उपसरपंच रोहिदास राहणे, सोमनाथ रहाणे, नानासाहेब राहणे, दादाभाऊ शिरतार, रमेश सरोदे, बाळासाहेब सरोदे, दादाभाऊ राहणे, गुलाब भोसले, काशिनाथ पावसे, अरुण उदमले आदी उपस्थित होते.
खा. लोखंडे म्हणाले, पश्चिम घाट माथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे 100 टीएमसी पाणी वाचविले तर 2005 मध्ये नगर जिल्ह्यातील पुढार्यांनी केलेला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द होण्यास मदत होईल. हे पाणी नगर जिल्ह्यातील उत्तरेचे 6 तालुके, नाशिक जिल्ह्यातील काही तालुके तर मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांचा पाणी प्रश्न नक्कीच सुटेल. समन्यायी पाणी वाटपाच्या केलेल्या कायद्याचे पाप खर्या अर्थाने झाकायचे असेल तर घाटमाथ्यावरील 100 टीएमसी वाचवलेले पाणी जायकवाडीकडे वळविल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यावरील 100 टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जसे आपल्याला श्रीसाईबाबांच्या पुण्याईमुळे निळवंडेचे पाणी मिळाले. तसाच या पुण्याईचा उपयोग करून घाटमाथ्यावरील पाणी वळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी किसान सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सुरेश राहणे तर आभार किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ राहाणे यांनी मानले.
मागणी करताच 49 लाख रुपयांचा निधी मंजूर!
चंदनापुरी घाटातील तामकडा पाझर तलाव दुरुस्तीसाठी चंदनापुरीचे रामभाऊ राहाणे, अंकुश राहाणे व शाम राहणे यांनी माझ्याकडे प्रस्ताव दिला होता. पाझर तलावाची दुरुस्ती केल्यास तीन गावांमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. हा पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. त्यांनी लगेच ऑर्डर काढून पाझर तलाव दुरुस्तीसाठी 49 लाख रुपये मंजूर केले.
आमच्या कामांचे श्रेय घेण्यास दुसरेचं पुढे येतात !
संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी, आनंदवाडी परिसरात तामकडा पाझर तलाव दुरुस्तीचा पाठपुरावा मी केला, मात्र या परिसरात लावलेल्या फलकावर 'आम्ही मंजूर केल्याचे' पत्र लावले. यावरून तुम्ही किती बनवाबनवी करायची, हे ठरवा. कामे आम्ही मंजूर करायची आणि श्रेय घेण्यास दुसरेचं पुढे येत आहेत. ही केविलवाणी गोष्ट असल्याची टीका खा. सदाशिव लोखंडे यांनी श्रेय घेणार्यांवर केली.
हे ही वाचा :