राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी परिसरासाठी ज्वलंत बनलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करीत अधिकार्यांसह बैठकीची मागणी केली. ग्रामीण रुग्णालय हे शहरातच व्हावे, जागेचा मुद्दा सोडविण्यात आल्याचे आ. तनपुरे यांनी सांगताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत शहरातच ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी आ. तनपुरेंससह अधिकार्यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
आ. तनपुरे यांच्या पाठपुराव्याने राहुरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होत आहे. बसस्थानक व ग्रामीण रुग्णालयासाठी आ. तनपुरे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दोन्ही प्रश्न हे महाविकास आघाडी शासन काळातच मार्गी लागणार होते. परंतु सत्ताबदल झाल्याने नविन शासनाचे नविन धोरण अंमलात आले. महाविकास आघाडी शासन काळातील अनेक कामांना स्थगिती मिळाली. परंतु माझ्या मतदार संघातील समस्या सोडविल्या गेल्याच पाहिजे हा उदात्त हेतू राखत आ. तनपुरे यांनी संबंधित विभागांकडे पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. बसस्थानकाबाबत परिवहन विभागाच्या अधिकार्यांची दोनदा भेट घेतली.
त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आ. तनपुरे यांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधले. आ. तनपुरे म्हणाले, राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी लोकप्रतिनिधी म्हणून अथक प्रयत्न केले. शहरातील जागेचा न्यायालयीन अडसर सोडविला. शहरातच ग्रामीण रुग्णालय असावे ही सर्वांची भावना आहे. जागेचा प्रश्न सोडविण्यात आला असताना शहराबाहेर ग्रामीण रुग्णालय बांधकाम होणार असल्याची चर्चा आहे. तसा प्रकार होऊ नये. आरोग्य विभागाचे राज्यातील वरिष्ठ अधिकार्यांकडून लोकप्रतिनिधी म्हणून अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. रुग्णालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन सुरू असतानाच बैठक घेण्याची मागणी केली.
यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. तनपुरे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जर शहरातच जागा असेल तर बाहेर ग्रामीण रुग्णालय बांधणी योग्य ठरणारच नाही. त्यामुळे आ. तनपुरे यांच्यासह अधिकार्यांची अधिवेशन काळातच बैठक घेऊन ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन ना. विखे यांनी दिले. राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे. शहरासह ग्रामीण पट्यातील लाखो लोकांचे डोळे आरोग्य प्रशासनाच्या निर्णयाकडे लागलेले आहे. त्यामुळे राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली.
शिर्डी-शनि शिंगणापूर या जागतिक देवस्थानाच्या मध्यवर्ती असलेल्या राहुरी शहरात सर्व सोय सुविधा असलेला शासकीय एकही रुग्णालय नाही. अपघाताच्या घटना तसेच आजारपणात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे अनेक उदाहरणे आहेत. राहुरीत सर्व सोय सुविधा असलेले ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व्हावे अशी अपेक्षा सर्वांना लागलेली आहे.
हेही वाचा